रत्नागिरी – जिल्ह्यात वाढत चाललेली अंमली पदार्थ विक्री आणि त्याचा तरुण पिढीवर होणारा घातक परिणाम लक्षात घेता, रत्नागिरी पोलीस प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, यापुढे अंमली पदार्थ विक्री करणार्यांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. ते रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. पोलीस अधीक्षक बगाटे म्हणाले, अंमली पदार्थ विक्री करणार्यांची आणि पुरवठा करणार्यांची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी कंबर कसली आहे. अशा गुन्हेगारांना कोणतीही माफी दिली जाणार नाही. यापुढे फक्त कारवाईच नाही, तर कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी कठोर उपाययोजना राबवल्या जातील.
बगाटे यांनी पुढे सांगितले की, अंमली पदार्थ तस्करी व विक्री प्रकरणी ज्यांच्यावर आधीच गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर तडीपारीचे प्रस्ताव तयार करून पाठविण्यात आले आहेत. तसेच, ज्या गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे, त्यांच्याविरोधात आता मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तरुण पिढी अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकत चालल्याने अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अंमली पदार्थविरोधात विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. यात पुरवठा करणारे नेटवर्क, स्थानिक वितरक, तसेच त्यामागील आर्थिक साखळी यांचा तपशीलवार शोध घेतला जात आहे. या पत्रकार परिषदेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, ग्रामीण पोलीस निरीक्षक यादव, ग्रामीण पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव,तसेच अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. सर्वांनी मिळून या मोहिमेसाठी एकसंघ आणि ठाम भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला. पोलीस अधीक्षक बगाटे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले की, कोणत्याही संशयास्पद हालचाली, अंमली पदार्थांची विक्री अथवा तस्करी संबंधी माहिती असल्यास पोलिसांना त्वरित कळवा. तुमचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल. ही लढाई केवळ पोलिसांची नाही, तर समाजाच्या भविष्यासाठी संपूर्ण जिल्ह्याची आहे.



