रत्नागिरी : घरोघरी गणरायाचे आगमन झाल्यानंतर साऱ्यांना गौराईच्या आगमनाची उत्सुकता लागते. विशेषतः सुवासिनींमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह होता. रविवारी पावसाचा किरकोळ सरींमध्ये सुवासिनींनी गौराई आणून तिचे स्वागत केले. दीड दिवसासाठी पाहुणे आलेल्या या माहेरवाशीणीचे सर्वत्र उत्साहात आणि थाटामाटात स्वागत करण्यात आले. गणेशोत्सवात गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून त्यांना “ज्येष्ठा गौरी” असेही संबोधले जाते. काही ठिकाणी जेष्ठा गौरी बसवली जाते तर काही ठिकाणी ज्येष्ठा व कनिष्ठ अशा दोन गौरी बसवण्याची पद्धत आहे. गौरी ही निसर्गदेवता असल्याने तिचे वास्तव्य निसर्गातील पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांजवळ असल्याचे मानले जाते. त्यामुळेच नदी विहीर, तळे, एकूणच पाणवठयावरून गौरी आणण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणे रोवळी परडीत हळद पेरडा आघाडाचे एकेक रोपटे पानाचा विडा उदबत्ती हळदी कुंकवाचा करंडा रांगोळी फुले पाण्याच्या तांब्या वगैरे साहित्य घेऊन सुवासिनी स्त्रियांनी व कुमारीकांनी पाणवठयावरून रोपट्यांची व विड्यांची विधिवत पूजा केली. पूजेनंतर गौरीची रोवळी घरी आणून गणपती जवळ विधीवत ठेवण्यात आले. काही ठिकाणी पाणवठयावरचे प्रतिमात्मक पाच खडे आणून त्यांचे गौरी पूजन करण्यात आले. कोकणातील अनेक घरांमध्ये लाकडाच्या पूर्णाकृती गौरी आहेत. हल्ली फायबरच्या ही पूर्णाकृती गौरीही उपलब्ध आहेत. गौराईला नवी कोरी साडी नेसवून दागिन्यांनी सजविण्यात आली. गौराई विराजमान झाल्यानंतर तिला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला.
आज ओवसे पूजन
सोमवारी गौरी पूजन होणार आहे. गौराईचे आगमन जर पूर्वा नक्षत्रात असेल तर नवविवाहिता ओवसे पूजन करतात पाच लहान मोठी सुपे घेऊन त्यामध्ये पाच प्रकारची फळे तांदूळ नारळ विडा पाच फराळाचे पदार्थ ठेवून पूजन केले जाते.



