Monday, March 23, 2026

Latest Posts

“कोणी एमडी, गांजा आणतंय हे हे माझ्या कानावर आलंय..”; उदय सामंतांचा गुंडांना सज्जड दम! क्रांतीनगरच्या सभेत फटकेबाजी “माझ्या मतदारसंघात दादागिरी खपवून घेणार नाही”; क्रांतीनगरच्या सभेत पालकमंत्र्यांचा ‘रुद्र अवतार’

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ५ मधील क्रांतीनगर येथे झालेली महायुतीची सभा चांगलीच गाजली. पालकमंत्री उदय सामंत यांनी या सभेत विरोधकांवर हल्लाबोल तर केलाच, पण त्यासोबतच प्रभागात दादागिरी करणाऱ्या आणि अवैध धंदे चालवणाऱ्यांना सणसणीत इशारा दिला. “माझ्या मतदारसंघात दादागिरीला स्थान नाही. कोणी एमडी किंवा गांजा आणत असेल तर भविष्यात निवडणुका लढवता येणार नाहीत, अशी पोलीस कारवाई केली जाईल,” अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी गुंडांना दम भरला.प्रभाग क्रमांक ५ मधून महायुतीकडून सौरभ मलुष्टे आणि पूजा पवार हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेत नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.

*◼️”दादागिरी खपवून घेणार नाही”*
सभेत बोलताना उदय सामंत यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर कडक भाष्य केले. ते म्हणाले, “काही जणांना मी शिवसेनेचे पद देण्याचे, नगरसेवक करण्याचे आश्वासन दिले होते, पण दादागिरी करून जर कोणी पद मिळवण्याचा प्रयत्न करत असेल, तर माझ्यासारखा वाईट पालकमंत्री दुसरा नाही. या जिल्ह्यात कायद्याचे आणि पोलिसांचे शासन चालते. कोण काय करतंय, कोण एमडी आणतंय, कोण गांजा आणतंय, या गोष्टी माझ्या कानावर आल्यात. मला खोलात जायला लावू नका, अन्यथा पोलीस अशी कारवाई करतील की भविष्यात निवडणूक लढवायचे स्वप्नही पाहता येणार नाही.”

*◼️घरांचे प्रश्न आणि ३० वर्षांची मुदतवाढ*
क्रांतीनगरमधील घरांच्या प्रश्नावर बोलताना सामंत यांनी माजी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी,सौरभ मलुष्टे आणि दीपक पवार यांच्या कार्याचा उल्लेख केला. “तुमच्या घराची मुदत संपली होती, तेव्हा बंड्याशेठ साळवी यांनी प्रस्ताव तयार केला आणि आम्ही सर्वांनी मिळून त्याला ३० वर्षांची मुदतवाढ दिली. ज्यांनी आपल्याला छप्पर दिले, त्यांच्या विरोधात मतदान करणे योग्य नाही. पुढील ४ वर्षे मीच पालकमंत्री असणार आहे, याचे भान नागरिकांनी ठेवावे,” असे आवाहन त्यांनी केले.

*◼️झोपडपट्टीवासीयांना पक्क्या घरांचे स्वप्न*
झोपडपट्टी पुनर्वसनाचा महत्त्वाचा मुद्दा मांडताना सामंत म्हणाले, “मी तुम्हाला शब्द देतो की येत्या वर्षभरात झोपडपट्टी पुनर्वसनाचा (SRA) आराखडा तयार करून या ठिकाणी पक्की घरे बांधली जातील. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. जसा मी चांगल्या घरात राहतो, तसे माझे झोपडपट्टी बांधवही चांगल्या घरात राहिले पाहिजेत, हीच माझी भूमिका आहे.”

*◼️”मतदान कुठे झाले हे समजते”*
मतदारांना सूचक इशारा देताना आणि भावनिक साद घालताना सामंत म्हणाले, “हल्ली ईव्हीएम मशीन आणि बॅलेट युनिटमुळे मतदान कुठे झाले हे बरोबर कळते. क्रांतीनगरने काय केले, नवला नगरने काय केले, हे सर्व समजते. त्यामुळे नाहक विकासकामांमध्ये कटुता नको. शिल्पाताई सुर्वे नगराध्यक्ष होणार हे निश्चित आहे आणि त्या झाल्यावरच तुमच्या प्रभागाचा विकास वेगाने होईल. त्यामुळे विकासाच्या बाजूने, म्हणजेच धनुष्यबाणाच्या बाजूने मतदान करा.”

*◼️३२ पैकी ३२ जागा जिंकण्याचा विश्वास*
पोलिसांच्या रिपोर्टचा हवाला देत सामंत म्हणाले की, “पोलिसांना विचारले तरी ते सांगतील की नगराध्यक्षपदी शिल्पाताई सुर्वेच बसणार आहेत आणि नगरपालिकेच्या ३२ पैकी ३२ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येणार आहेत.”

सौरभ मलुष्टे आणि पूजा पवार हे तुमच्या मनातील अपेक्षित कामे नक्कीच पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.