खेड: ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवतेज आरोग्य सेवा संस्था, खेड संचलित छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल, जामगे येथे ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमास गृह राज्यमंत्री मा. श्री. योगेश कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मा. मंत्री महोदयांच्या हस्ते सकाळी ८ वाजता राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर सर्वांनी राष्ट्रगीत गायन करून स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानास नम्र अभिवादन केले. आपल्या मनोगतात बोलताना मा. योगेश कदम म्हणाले की, “देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण करून, त्यांच्या आदर्शांनुसार आपण कर्तव्य पार पाडले पाहिजे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच शिस्त, देशभक्ती आणि सामाजिक जबाबदारी जोपासली पाहिजे. ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो’ हे केवळ घोषवाक्य न राहता कृतीत उतरले पाहिजे.”
शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या वतीने संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि पालक यांनी कार्यक्रम यशस्वी केला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, कविता व लघुनाटिका सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकले. कार्यक्रमात संस्थेच्या कार्याचा आढावा घेत शाळेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती देण्यात आली.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण परिसर ‘जय हिंद’ व ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी दुमदुमून गेला.



