रत्नागिरी : रत्नागिरीतील ग्रामीण भागात भाड्याच्या जागेतून आरोग्य सेवा पुरवणाऱ्या आरोग्य उपकेंद्राना स्वतःच्या मालकी हक्काच्या जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रूपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्याकडे केली आहे.
रत्नागिरीतील ग्रामीण भागात गरीब रुग्णांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आरोग्य उपकेंद्रांची उभारणी करण्यात आली आहे; मात्र या उपकेंद्राना स्वतःच्या हक्काची जागा नसल्याने भाड्याच्या जागेतून रुग्णसेवा करावी लागत आहे. शासनाकडून एकूण मंजूर झालेल्या ३७८ आरोग्य उपकेंद्रापैकी २१८ उपकेंद्राच्या हक्काच्या इमारती आहेत. त्यातील १०१ इमारतींसाठी अजूनही हक्काची जमीन मिळालेली नाही, तर काही उपकेंद्रे निर्माणाधीन अवस्थेत आहेत.
ग्रामीण भागातील ही उपकेंद्रे गरजू व गरीब रुग्णांच्या आरोग्यासाठी जीवनदायी ठरत आहेत. या उपकेंद्रामध्ये किरकोळ स्वरूपाचे उपचार करण्यात येत असले, तरी या रुग्णांना मोक्याच्या क्षणी व गरजेच्या वेळी याच उपकेंद्राच्या आधार असतो. ही बाब लक्षात घेता या उपकेंद्राच्या इमारत बांधणीसाठी लागणारी जमीन खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विशेष आर्थिक तरतूद करणे अत्यावश्यक आहे. या निवेदनाच्या माध्यमातून मनसेने आग्रही मागणी केली आहे.
जिल्हा परिषदेने वरिष्ठ शासनस्तरावर या मागणीचा तातडीने पाठपुरावा करावा व गोरगरीब जनतेच्या आरोग्याशी निगडित असलेला हा अती महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावून ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी मनसेकडून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली आहे. या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करू, असे आश्वासन यावेळी देण्यात आले आहे.
हे निवेदन देताना मनसे तालुका अध्यक्ष रूपेश जाधव, तालुका सचिव ॲड. अभिलाष पिलणकर, तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, विशाल चव्हाण, विभाग अध्यक्ष सोम पिलणकर, संजय आग्रे आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.