रत्नागिरी : आपला भारत देश सर्वदृष्ट्या सुसंपन्न आहे. आज विविध शाळेत संस्कृत भाषा शिकवली जाते. मात्र ह्या भाषेत आपले प्राचीनतम ज्ञान सामावलेले आहे. देशाला अभिमान वाटावा अशी ही संस्कृत भाषा आहे असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी काढले. ते कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे (रामटेक) भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी संस्कृत उपकेंद्र आणि भारतीय भाषा समिती शिक्षा मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने व संस्कृत विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी (स्वायत्त) आणि माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी व संस्कृत शिक्षक मंडळ रत्नागिरी जिल्हा यांच्या सहयोगाने आयोजित एकदिवसीय सरलमानक संस्कृत कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात विशेष अतिथी रूपाने बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की सध्या नवीन शैक्षणिक प्रणालीत भारतीय ज्ञान परंपरा अर्थात IKS ला अधिक महत्व देण्यात येत आहे. त्यामुळे त्याचा प्रसार कसा होईल व त्याओघाने संस्कृत भाषेचे जतन संवर्धन कसे होईल यावर विशेषत्वाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे संस्कृत शिक्षक संस्कृत विषय शिकवतात हे स्तुत्यच आहे मात्र आता संस्कृत विषय म्हणून न राहता भाषा म्हणून विद्यार्थ्याना कसा शिकवता येईल यावर भर देणे आवश्यक आहे. असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी महापंडित धर्मानंद कोसांबी यांचे देखील उदाहरण दिले. उपस्थित संस्कृत शिक्षकांना संस्कृत भाषेच्या प्रसार प्रचारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी जिल्ह्याचा शिक्षण विभाग कटिबद्ध आहे असे आश्वासन दिले.
या वेळी संस्कृतभारती गीता शिक्षण केंद्राचे प्रमुख शिरीष भेडसगावकर , गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथील संस्कृत विभागप्रमुख आणि कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ कल्पना आठल्ये, संस्कृत शिक्षक मंडळाच्या अध्यक्षा स्मिता सरदेसाई आणि रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील संस्कृत शिक्षक, उपकेंद्रातील विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.



