रत्नागिरी, दि. १८ जानेवारी २०२६ :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रत्नागिरी नगर यांच्या वतीने आज (रविवार) शहरात शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण नगर संचलन करण्यात आले. शहरातील विविध वस्त्यांमधून स्वयंसेवकांनी एकत्र येत संघशक्ती, शिस्त आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले. संध्याकाळच्या वेळेत निघालेल्या या संचलनामुळे शहरात शिस्तीचे व राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
हे नगर संचलन तीन स्वतंत्र मार्गांवरून काढण्यात आले. मार्ग क्रमांक १ अंतर्गत माळनाका, मिऱ्या आणि शिवाजीनगर या वस्त्यांतील स्वयंसेवकांचे संचलन विद्यार्थी वसतिगृह, मुरुगवाडा येथून सुरू झाले. श्री भैरी मंदिर, मुरलीधर मंदिर, काँग्रेस भवन, गोखले नाका, मारुती आळी, तेली आळी नाका व भुते नाका मार्गे हे संचलन पटवर्धन हायस्कूल परिसरात दाखल झाले.
मार्ग क्रमांक २ मध्ये मांडवी, नाचणे आणि कर्ला या वस्त्यांतील स्वयंसेवक मांडवीतील होळीच्या मैदानातून संचलनात सहभागी झाले. एकमुखी दत्त मंदिर, घुडेवठार, गिरोबा चौक, तेली आळी, तेली आळी नाका व भुते नाका असा मार्ग पार करत हे संचलनही पटवर्धन हायस्कूलकडे वळले.
मार्ग क्रमांक ३ अंतर्गत झाडगाव, कुवारबाव व खेडशी या वस्त्यांतील स्वयंसेवकांचे संचलन फाटक हायस्कूल येथून निघाले. तांबट आळी, शहर पोलीस ठाणे, धनजी नाका, मच्छी मार्केट, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पेट्रोल पंप परिसरातून स्टॅण्डसमोरून तेली आळी नाका व भुते नाका मार्गे हे संचलन अंतिम स्थळी पोहोचले.
तेली आळीच्या नाक्यावर सर्व स्वयंसेवकांची पथके शिस्तबद्ध रीतीने एकत्र आली आणि तिथून भुते नाक्यावरून वळून हे संचलन पटवर्धन हायस्कूलच्या मैदानावर पोहोचले.
संपूर्ण संचलनादरम्यान स्वयंसेवकांनी गणवेशात, शिस्तबद्ध पंक्तीमध्ये संचलन करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी संचलन पाहण्यासाठी गर्दी केली होती. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणेचे सहकार्य लाभले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या नगर संचलनामुळे शहरात संघटन, शिस्त व सामाजिक सलोख्याचा सकारात्मक संदेश पोहोचल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत होती.



