Friday, March 6, 2026

Latest Posts

रत्नागिरी पोलिसांचा नऊ वर्षांचा सच्चा साथीदार  विराटने घेतला जगाचा निरोप

रत्नागिरी :  रत्नागिरी पोलिसांचा विश्वासू, धाडसी साथीदार विराट या पोलीस श्वानाचे गुरुवारी अकस्मिक निधन झाले. एका कर्तबगार सहकाऱ्याच्या अशा आकस्मिक जाण्याने संपूर्ण रत्नागिरी पोलीस दलावर शोककळा पसरली असून, त्याच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉबरमन जातीचा असलेला विराट २०१७ साली रत्नागिरीच्या पोलीस दलात दाखल झाला होता. गेल्या ९ वर्षांच्या त्याच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्याने आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना महत्त्वाची साथ दिली होती.  यामध्ये प्रामुख्याने २ खुनाचे गुन्हे, १ अपहरणाचा गुन्हा आणि १० चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. गुन्हेगारापर्यंत पोहोचताना विराटची चपळाई आणि कुशाग्रपणा, वासावरून गुन्ह्याची क्लू पोलिसांना मिळवून देण्यात त्याचा हातखंडा होता, ज्यामुळे पोलीस तपासाला मोठी गती मिळत असे.

अशा विश्वासू साथीदाराचा आज आकस्मिक मृत्यू झाला आणि पोलीस दलावर शोककळा पसरली. आपला एक सच्चा साथीदार गमावल्याची भावना सर्वांमध्ये होती. या लाडक्या साथीदाराला पोलिसांच्या बॉम्ब शोध नाश पथकाच्या कार्यालयाच्या आवारात शेवटचा निरोप सुद्धा साश्रू नयनांनी आणि शासकीय इतमामाने देण्यात आला.

यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुळसंगे, पोलीस उपनिरीक्षक शेगाबेन मावची पोलीस उपनिरीक्षक किरण घाग  आणि इतर पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या लाडक्या सहकाऱ्याला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते.

विराटला घडवण्यात आणि त्याच्याकडून कामगिरी करून घेण्यात त्याचे हॅन्डलर पोलीस हवालदार महेश हरचिरकर आणि पोलीस हवालदार संदेश कोतवडेकर यांचा मोठा वाटा होता.  विराटने अनेक मोहिमा फत्ते केल्या होत्या. या सर्वांना सुद्धा कुटुंबातील एक सदस्य गेल्याची भावना निर्माण झाली होती.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.