Saturday, March 21, 2026

Latest Posts

रत्नागिरी लोहमार्ग पोलिसांनी अट्टल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील सापे वामने ते दिवाणखवटी रेल्वेस्थानकादरम्यान गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटना वाढल्या असून, या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी पथक तयार करून त्या अनुषंगाने तपासाची चक्रे फिरवली आणि काही महिन्यांच्या कालावधीत या गुन्ह्यांचा छडा लावत अहिल्यानगर येथून एकाला ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. विनोद सखाराम जाधव (जामखेड, जि. अहिल्यानगर) असे त्याचे नाव असून, त्याला ३० नोव्हेंबर रोजी अटक केले आहे. न्यायालयाने त्याला १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
संदर्भात कोकण रेल्वे स्थानकात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी लोहमार्ग (मुंबई) हार्बर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त निलिमा कुलकर्णी, रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याचे  निरीक्षक प्रवीण पाडवी आणि पोलीस उपनिरीक्षक सुनील लोणकर उपस्थित होते.

याविषयी सविस्तर माहिती देताना श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या, “प्रवासी गाढ झोपेत असताना रात्रीच्या वेळी होणाऱ्या या चोऱ्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, या घटनांचा छडा लावण्यात रत्नागिरी लोहमार्ग पोलिसांना मोठे यश आले आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यांच्या काळात दाखल झालेल्या आठ चोरीच्या प्रकरणांचा तपास करून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याकामी चारजणांची टोळी कार्यरत असल्याचे प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झाले आहे. लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विनोद जाधव याच्याकडून मारुती राजेंद्र झरे (रा. आष्टी, जि. बीड), सोनू सुरेश काळे (रा. जामखेड, जि. अहिल्यानगर) आणि लाला मच्छिंद्र पवार (रा. जामखेड, अहिल्यानगर) या तिघांची नावे पुढे आली आहेत.”

यापूर्वी रेल्वे मार्गावरील चोऱ्यांवर लक्ष केंद्रित करणे रत्नागिरी पोलिसांना कठीण होत होते. या समस्येवर उपाय म्हणून रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर स्वतंत्र लोहमार्ग पोलीस स्टेशन स्थापन करण्यात आले आहे. या नव्या युनिटने तात्काळ कामाला सुरुवात करत वाढत्या चोरीच्या घटनांचा तपास हाती घेतला.

अगदी कमी वेळेत लोहमार्ग पोलिसांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत रेल्वेत झालेल्या चोरीच्या आठ तक्रारी रत्नागिरी लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या होत्या. या तक्रारींचा कसून तपास करत पोलिसांनी एका मुख्य आरोपीला अटक केली आहे. चोरीला गेलेला अंदाजे ५ लाख रुपयांपर्यंतचा मुद्देमाल पोलिसांनी यशस्वीरित्या हस्तगत केला आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची सध्या कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान, या चोरीच्या कटात आरोपीचे तीन साथीदार देखील सहभागी असल्याचे उघड झाले आहे. हे तीनही आरोपी सध्या फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी लोहमार्ग पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईमुळे कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, रात्रीच्या वेळी होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आता प्रभावीपणे चाप बसणार आहे. दरम्यान, पुरेशा सीसीटीव्ही अभावी तपासकामात अडचणी निर्माण होत आहेत. कोकणचा भौगोलिक दृष्ट्या विचार करता येते आणखी न सीसीटीव्ही बसवणे गरजेचे असून तशी मागणी केल्याचे यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती कुलकर्णी यांनी सांगितले.

रेल्वेने रात्रीच्या वेळेस प्रवास करताना सीट जवळील सर्व खिडक्या बंद करून प्रवास करण्याचे तसेच योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.