रत्नागिरी : शहरातील झाडगाव येथील “स्वस्तिक मित्र मंडळाच्या माघी गणेशोत्सवाला यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने वाडीतील ५० ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. श्री देव भैरी देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र उर्फ मुन्ना सुर्वे यांच्या हस्ते हे सर्व सन्मान करण्यात आले. ही आगळी संकल्पना कांचन डिजिटलचे प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांची होती. या आगळ्या संकल्पनेचे मुन्ना सुर्वे यांनी विशेष कौतुक केले.
“स्वस्तिक मित्र मंडळाच्या” माघी गणेशोत्सवाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या २५ वर्षांत मंडळाने सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक असे विविध उपक्रम राबविले. यंदाही विशेष उपक्रम राबवून रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्याचे ठरले. त्यानुसार रौप्य महोत्सवी वर्षाच्या दुप्पट ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्याची संकल्पना कांचन मालगुंडकर यांनी मांडली आणि मंडळाने वाडीतील ५० ज्येष्ठ नागरिकांचा भव्य सत्कार समारंभ घडवून आणला. याबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी आनंद व्यक्त केला. शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन हा हृद्य सत्कार सोहळा करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष संदीप वर्तक, फोटोग्राफर कांचन डिजिटल चे कांचन मालगुंडकर, श्याम खानविलकर, प्रशांत मालगुंडकर, पारस खानविलकर, राजू कडू, सचिन वर्तक आदी मान्यवर उपस्थित होते.