रत्नागिरी: जागतिक स्तरावर शांततेचा संदेश देणारे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे गुरुवार आज २२ जानेवारी रोजी रत्नागिरी आगमन होत आहे. या खास भेटीनिमित्त शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विस्तीर्ण मैदानावर सायंकाळी ६ वाजता भव्य भक्ती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. रोजचा धकाधकीचा जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे ताणतणाव वाढत आहेत या डिजिटल युगात मनुष्याला सुखी समाधानी आयुष्य जगणं दुर्मिळ होत असताना या धकाधकीत मन आनंदी राहण्यासाठी मनापासून हसणे जीवनात फार महत्त्वाचे असल्याचा संदेश जगाला देणारे सुदर्शन क्रियेचे प्रणेते श्री श्री रवीशंकर यांचे मार्गदर्शन कोकणवासीयांना अनुभवता येणार आहे. हा भक्ती उत्सव म्हणजे केवळ एक व्याख्यान नसून तो ज्ञान ध्यान आणि सुश्राव्य भजन सत्संगाचा एक अनोखा त्रिवेणी संगम असणार आहे. प्रत्यक्ष गुरुदेवांच्या उपस्थितीत सामूहिक ध्यान करण्याची संधी रत्नागिरीकरांना मिळणार असून हा अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात नवी ऊर्जा देणारा ठरेल. रत्नागिरी ही निसर्गसंपन्न आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध भूमी आहे. गुरुदेवांच्या आगमनामुळे या भूमीच्या अध्यात्मिक महत्वांमध्ये मोलाची भर पडणार आहे. या भव्य सोहळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगची मोठी टीम अहोरात्र मेहनत घेत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह कोल्हापूर पुणे मुंबई सांगली, सातारा या शहरांमधून १५ ते २० हजार नागरिक या भक्ती उत्सवात सहभागी होतील असा अंदाज आहे.



