रत्नागिरी: रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थानच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त (५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल) ‘सुवर्ण महोत्सवी स्मरणिका २०२६’ प्रकाशित करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक निमित्ताने देवस्थानच्या वतीने रत्नागिरी जिल्हा, कोकण विभागातील लेखक, अभ्यासक, इतिहासप्रेमी, संशोधक, पत्रकार आणि भक्तांना त्यांचे मौलिक व अप्रकाशित लेख पाठवण्याचे नम्र आवाहन करण्यात आले आहे. ही स्मरणिका देवस्थानचा धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा जपण्याचा एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार असून, यात सहभागी होणाऱ्या लेखकांसाठी काही विशेष विषय आणि सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
स्मरणीकेसाठी देवस्थानचा इतिहास व परंपरा, इतर मंदिरांची माहिती, कोकणातील लोकदैवतांची संकल्पना, श्री देव भैरी देवाची लोकश्रद्धा व भक्तीपरंपरा, भाविकांना आलेले अनुभव आणि वार्षिक सोहळे व उत्सव यांसारख्या विविध विषयांवर लेख पाठवता येतील. लेख पाठवताना ते मराठी भाषेत, स्वतःचे आणि अप्रकाशित असावेत. लेखासोबत लेखकाचे नाव, पत्ता व संपर्क क्रमांक असणे अनिवार्य असून, जुनी संग्रहित छायाचित्रे असल्यास ती देखील सोबत पाठवता येतील. तसेच, लेखनासाठी वापरलेल्या संदर्भांची जंत्री देणे आणि लेखात संशोधनात्मक अचूकता व सभ्यता राखणे आवश्यक आहे.
लेखक किंवा साहित्यिकांकडून प्राप्त होणाऱ्या मजकुराचे संपादन करण्याचे, त्यात आवश्यक बदल करण्याचे किंवा दुरुस्ती करण्याचे सर्व अधिकार संपादकीय मंडळाकडे राखीव राहतील. इच्छुक लेखकांनी आपले लेख ‘श्री देव भैरी मंदिर, झाडगाव, रत्नागिरी – ४१५६१२’ या पत्त्यावर पाठवायचे आहेत. या उपक्रमातून देवस्थानच्या वारशात मोलाचे योगदान लाभेल, अशी खात्री ‘भैरी देवस्थान स्मरणिका समिती, रत्नागिरी’ यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.



