रत्नागिरी, दि. १ (जिमाका) : गणपतीपुळे येथे २४ ते २८ डिसेंबर कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री २०२५ मधून ६३ लाख ५१ हजार ९७३ रुपयांची विक्री झाली. ५० लाख ४० हजार ६८ रुपये किंमतीची उत्पादन विक्री तर १३ लाख ११ हजार ९०५ रुपयांची खाद्य विक्री स्टॉलवरुन विक्री झाली आहे.
ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाननाची अंमलबजावणी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांसाठी संस्थीय बांधणी व क्षमता बांधणी निरंतर सुरु आहे. स्वयंसहाय्यता समूहातील महिलांची उपजीविका शास्वत व बळकट होण्यासाठी कामकाज सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजरपेठ उपलब्ध व्हावी या अनुषंगाने प्रादेशिक, विभाग व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे आयोजन होत असते. सन २०२५-२६ चे रत्नागिरी जिल्ह्याचे सरस प्रदर्शन व विक्री २०२५ चे आयोजन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विदयमाने श्री क्षेत्र, गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आले होते.
सरस प्रदर्शनाला वाढणारा प्रतिसाद बघून यावेळी ८३ स्टॉलची बांधणी करण्यात आली होती, ज्यामध्ये ६४ उत्पादने स्टॉल व १९ फुड स्टॉल समुहांना उपलब्ध करुन देण्यात आले होते.
या प्रदर्शनात ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादनाच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मानले जाते. या प्रदर्शनामध्ये स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध प्रकारच्या कलात्मक वस्तु (बुरुड काम, गोधडी, लोकरीच्या विणकाम केलेल्या वस्तु, क्रेयॉनच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी इत्यादी), विविध प्रकारचे घरगुती मसाले (मच्छी मसाले, मटण मसाले,)पिठे, पापड (नाचणी, उडीद, लसूण, सोयाबीन, पालक, बीट, टोमॅटो, पोह्याचे, ओव्याचे इत्यादी), लोणची (आंबा, लिंबू, मिरची, आवळा, करवंद इत्यादी), कोकम, आगळ इत्यादी., कोकणी मेवा (काजूगर, काजू मोदक, आंबावडी, आमरस, आंबापोळी आवळा मावा, फणसपोळी, करवंद वडी, तळलेले गरे इत्यादी), विविध फळांची सरबते (जांभूळ सिरप, आंबा सिरप, काजू सिरप, आवळा सिरप इत्यादी), रस, कोकणी खाद्यपदार्थ (मोदक, आंबोळी, थालीपीठ, पुरणपोळी, घावणे, नारळवडी, ), जेवण, नर्सरी (आंबा कलमे, काजू कलमे, नारळ कलमे, चिकू कलमे, कोकम कलमे, विविध प्रकारची शोभिवंत फुलझाडे, बोन्साय इत्यादी), मध माफक दरात ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले.
सरस कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रभाग संघातील महिला, अधिकारी, कर्मचारी तसेच गणपतीपुळे येथे भेट देणा-या पर्यटकांनी सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला यात बासुरी वादन,कथ्थक \गीत गायन यामध्ये सहभाग घेतला.
पाककला स्पर्धा गोड व तिखट पदार्थ, उत्कृष्ट मांडणी, उत्कृष्ट विक्री – उत्पादने, उत्कृष्ट विक्री फूड स्टॉल यासाठी स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते.
पाककला स्पर्धा गोड पदार्थमध्ये अर्चना संतोष साळवी प्रथम क्रमांक, अस्मिता बिपीन तोडणकर द्वितीय क्रमांक, प्रियांका निलेश बहुतले तृतीय क्रमांक तर पाककला तिखटमध्ये पायल प्रशांत कदम प्रथम क्रमांक, स्वरा वैभव देसाई द्वितीय क्रमांक आणि रविना कल्पेश गायकवाड यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
*उत्कृष्ट मांडणी* मध्ये धनलक्ष्मी स्वयंसहाय्यता समुहाला प्रथम क्रमांक, सृष्टी स्वयंसहाय्यता समुहला द्वितीय क्रमांक, नारीशक्ती स्वयंसहाय्यता समुहाला तृतीय क्रमांक मिळाला, श्रेय महिला उत्पादक गटाला उत्तेजनार्थ पारीतोषिक देण्यात आले.
*उत्कृष्ट विक्री उत्पादनमध्ये* भक्ती स्वयंसहाय्यता समुहाला प्रथम क्रमांक, कोकण कलश महिला शेतकरी उत्पादक कंपनीला द्वितीय क्रमांक तर उद्योगरत्न महिला प्रभागसंघाला तृतीय क्रमांक देण्यात आला.
*उत्कृष्ट विक्री – फुड स्टॉलमध्ये* संकल्प स्वयंसहाय्यता समुहाला प्रथम क्रमांक, धनज्योती महिला प्रभागसंघाला द्वितीय क्रमांक आणि भरारी स्वयंसहाय्यता समुहाला तृतीय क्रमांक मिळाला.



