रत्नागिरी : सध्या लोक कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाइलचा सर्रास वापर करीत आहेत. सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाइन होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने ही क्रांती वेगाने होत असतानाच सायबर गुन्हेगारीही वेगाने वाढू लागली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लोकांमध्ये सायबर सुरक्षेच्या बाबतीत आवश्यक असणाऱ्या माहितीचा अभाव. आणि त्याबाबत जाणून घेण्याबाबतची उदासीनता ही आहे. विशेष करून अल्पवयीन मुले व विद्यार्थी यांना आपल्या जाळ्यात सहजपणे ओढणारी अनेक प्रकारची संकटे यातून निर्माण होत आहेत. आर्थिक आमिषांना मध्यमवर्गीय आणि ज्येष्ठ नागरिक, अशा फसवणुकीच्या तक्रारींसाठी जिल्हा अधीक्षक कार्यालयाच्या अखत्यारितील सुसज्ज सायबर पोलिस ठाणे कार्यरत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्मिता सुतार आणि त्यांची टीम या ठाण्याची जबाबदारी सक्षमपणे सांभाळत आहे. गुन्ह्यांचा शोध लावतानाच नागरिकांनी जागरूक व्हावे, यासाठी शाळा, महाविद्यालये, महिला बचत गट आदींसाठी जागृतीचे उपक्रमही आयोजित केले जात आहेत.
आज भारत इंटरनेटच्या वापरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, सायबर सुरक्षेच्या बाबतीत पिछाडीवर आहे. सायबर गुन्हे हा एक प्रकारचा आर्थिक दहशतवादच आहे. सायबर गुन्हेगार ही माहिती खरेदी करून तिचा वापर फसवणूक व सायबर दरोड्यासाठी करू शकतात, हे कटू सत्य आहे. बुद्धिमान लोक जर या सायबर गुन्ह्यांना बळी पडतात तर अल्पवयीन मुले व विद्यार्थी हे या संकटापासून कसे बचाव करणार, हा यक्ष प्रश्नच आहे. सध्या तर मध्यमवर्गीय आणि ज्येष्ठ नागरिकही सायबरच्या विळख्यात मोठ्या प्रमाणावर अडकू लागले आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगारी फोफावू लागल्याने महाराष्ट्र शासनाने सध्या अस्तित्वात असलेल्या पोलिस ठाण्यांव्यतिरिक्त सायबर लॅब/तंत्रज्ञान युक्त गुन्हे अन्वेषण केंद्रात सायबर पोलिस ठाणे कार्यान्वित केली आहेत. रत्नागिरीतही जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अखत्यारितील सायबर पोलिस स्टेशन हे सीसीटीएनएस प्रणालीशी जोडले आहे. त्यामुळे येथे दाखल होणाऱ्या तक्रारी या एनसीआरबी दिल्लीला ऑनलाइन जोडण्यात आल्या आहेत. या सायबर पोलिस स्टेशनचे कार्यक्षेत्र संपूर्ण रत्नागिरी जिल्हा आहे. हे पोलिस ठाणे आर्थिक फसवणूक होणाऱ्यांसाठी दिलासादायी ठरत असून फसवणुकीचे गुन्हे, सोशल मीडिया संदर्भातील फसवणुकीच्या तक्रारी दाखल करण्यासाठी नागरिक पुढे येऊ लागले आहेत. मात्र, सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी व सुरक्षित ठेवण्यासाठी जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे.



अबब, फसवणुकीचे किती हे प्रकार?
- फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून लोकांना त्रास देणे.
- सेक्सटॉर्शन, ओएलएक्स, फ्रॉड, क्यू आर कोड लिंक, स्नीशिंग-फिशिंगद्वारे होणारे ऑनलाइन फ्रॉड.
- इलेक्ट्रिक बिल भरणे, त्वरीत लोन उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखविणे.
- इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग पॉइंट देण्याचे आमिष.
- नोकरी, विवाह विषयक फसवणूक.
- बॅंक खात्याची संपूर्ण डिटेल्स घेऊन ओटीपी शेअर करण्यास लावून ऑनलाइन रक्कम ट्रान्सफर करण्यास भाग पाडणे, बँक अधिकारी बोलतो, असे सांगून खातेदारांची माहिती घेऊन बॅंक रक्कम ऑनलाइन लांबविणे, क्रेडिट कार्ड-डेबिट कार्ड यांची माहिती विचारून फसवणूक करणे.
- Any Desk, Quik Support यांसारखे स्क्रीन शेअर ॲप डाउनलोड करावयास लावणे, यातून डाटा चोरणे.
………..
सायबर पोलिस ठाण्यात गेल्या सहा महिन्यांत दाखल गुन्हे
आर्थिक फसवणूक : ११
फसवणुकीची रक्कम : ६४,२७,०५०
गोठवलेली रक्कम : १,७७,०९३
सोशल मीडियासंदर्भातील गुन्हे : १८
……….
सायबर फसवणूक, कुठे कराल तक्रार ?
- सायबर पोलिस ठाणे, रत्नागिरी : ८८३०४०४६५०
- हेल्पलाइन क्रमांक : १९३० अथवा १४४०७
- www.cybercrime.gov.in
- संबंधित पोलिस ठाणे
……..
सायबर पोलिस ठाण्याची धुरा पोलिस निरीक्षक स्मिता सुतार यांच्या नेतृत्वाखाली हेडकाॅन्स्टेबल रामचंद्र वडार, संदीप नाईक, जान्हवी नाईक, श्रीया साळवी, दुर्वा शेट्ये, दीपिका सवाईराम, साैरभ कदम, अजिंक्य ढमढेरे, रोहन कदम, दशरथ मारुती कांबळे हे सांभाळत आहेत. प्रत्येकाकडे गुन्ह्यानुसार तपासाचे काम सोपविले जाते.



