दापोली : तालुक्यातील गोवा किल्ला ते सुवर्णदुर्ग किल्ला, केशवराज मंदिर, मंडणगड तालुक्यातील बाणकोट किल्ला या तीन ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांवर रोपवे प्रकल्पांना कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाली आहे. केंद्र सरकारच्या ‘पर्वतमाला’ योजनेंतर्गत राज्यात ४५ रोपवे प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. यात दापोलीतील वरील ३ स्थानांचा समावेश आहे. यामुळे पर्यटकांना या स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.
आसूदमधील केशवराज परिसर हे दापोली तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. डोंगरावर वसलेले केशवराज मंदिर हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सध्या मंदिरात जाण्यासाठी चढण व पायऱ्या चढाव्या लागतात ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांना त्रास होतो. रोपवेमुळे या भाविकांना सहजपणे मंदिरात दर्शन घेणे शक्य होईल. या रोपवेमुळे पर्यटन वाढून स्थानिक व्यवसायांना फायदा होईल. सुवर्णदुर्ग हर्णै बंदराजवळ समुद्रातील ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्यावर बोटीने जावे लागते. रोपवेमुळे पर्यटकांना किल्ल्यावर सहज जाता येईल. बाणकोट किल्ला डोंगरावर वसलेला आहे. या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना चढण चढावी लागते. रोपवेमुळे पर्यटकांना किल्ल्यावर सहज पोहोचता येईल.
या प्रकल्पांमुळे कोकणातील पर्यटन विकासाला नवी दिशा मिळेल. ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल. स्थानिक कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन मिळेल. ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील पर्यटन आणि दळणवळण क्षेत्रात मोठी सुधारणा होईल.
– दीपक खेडेकर, अध्यक्ष, हर्णै पंचक्रोशी कमिटी



