Tuesday, March 31, 2026

Latest Posts

१० कोटी ९४ लाख निव्वळ नफ्यासह ९९.८२% वसूली आणि १८.८१% व्यवसाय वृद्धी स्वरूपानंदचे सातत्य आणि प्रमाणबद्ध दर्शक रिझल्ट – ॲड.दीपक पटवर्धन

रत्नागिरी:  १० कोटी ९४ लाखाचा निव्वळ नफा ९९.८२% इतकी विक्रमी वसुली यासह २०२५-२६ या आर्थिक वर्षात स्वरूपानंदने १८.८१% व्यवसाय वृद्धी नोंदवली आहे हे जाहीर करताना मनस्वी आनंद होतो.
स्वरूपानंद पतसंस्थेने ३५ वर्षात सातत्यपूर्ण व्यवसाय वृद्धी करत उत्तम आर्थिक सौष्ठव राखले असल्याने संस्थेची विश्वासार्हता जनमानसाच्या मनावर कोरली गेली आहे. असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी केले.
*वृद्धिंगत होणारा व्यवसाय*
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात संस्थेने ठेवी रुपये ४०८ कोटी ८८ लाख तर कर्ज ३०२ कोटी ६५ लाख यासह ७११ कोटींचा संमिश्र व्यवसाय केला असून संस्थेने १६९ कोटी २९ लाखांच्या बँक गुंतवणूका केल्या. गुंतवणुकांमध्ये गतवर्षीपेक्षा १३.३६% वाढ नोंदवली आहे. ठेवींमध्ये रुपये ६२ कोटींची वाढ झाली असून ठेवींमध्ये १८ % वाढ नोंदवत ठेवी ४०८ कोटी ८८ लाखाच्या घरात पोहोचल्या आहेत. तर संस्थेच्या कर्जामध्ये ५० कोटींची वाढ झाली असून कर्ज वितरणात लक्षणीय १९.७९% ची वाढ नोंदवली आहे. या सर्वामुळे संस्थेचे वार्षिक उत्पन्न रुपये ४८ कोटी पर्यंत पोहोचले असून उत्तम व्यवस्थापन व उपलब्ध निधीचा योग्य विनीयोग केल्याने उत्तम नफा प्राप्त केला आहे. गेल्या ३५ वर्षात आर्थिक संस्थेला अत्यावश्यक असणार सातत्य, स्थैर्य संस्थेच्या आकडेवारीतून स्पष्ट होत. 
*सातत्यपूर्ण नफा*
गेल्या ५ वर्षात झालेला निव्वळ नफा सन २०२१-२२ रुपये ६ कोटी २१ लाख, सन २०२२-२३ रुपये ६ कोटी ६३ लाख, सन २०२३-२४ रुपये ७ कोटी ०३ लाख, सन २०२४-२५ रुपये ८ कोटी ३२ लाख, २०२५-२६ रुपये १० कोटी ९४ लाख हे स्थैर्याचा, सातत्याचा परिमाण म्हणून पाहता येईल.
*भरभक्कम स्वनिधी*
संस्थेने प्राप्त केलेल्या नफ्याचा विनियोग संस्थेने स्वनिधी वाढवण्यासाठी केला आहे. झालेल्या नफ्यातून अत्यावश्यक खर्च करून उर्वरित म्हणजे ५०% पेक्षा जास्त नफा स्वनिधी वाढवण्यासाठी संस्थेने गुंतवून स्वरूपानंदचा आर्थिक पाया भक्कम केला. स्वरूपानंदचा स्वनिधी रुपये ५५ कोटी झाला आहे. या व्यतिरिक्त गेल्या ३५ वर्षात साधारणतः २६००० चौरस फूटाच्या प्रॉपर्टी, १० कार्यालये संस्थेने स्वमालकीची खरेदी केली आहेत.
*५०० कोटींचे उद्दिष्ट*
   संस्थेने भांडवल पर्याप्तता अर्थात C.R.A.R चे प्रमाण २८.०८% असे लक्षणीय राखले आहे. असणारे धोके, देणी यांना मॅच करण्याएवढे स्वभांडवल संस्थेकडे किती प्रमाणात आहे हे दर्शवणारा C.R.A.R हा उत्तम असल्याने ठेवीदार, गुंतवणूकदार हे पूर्ण विश्वासून संस्थेकडे गुंतवणूक करतात. संस्थेकडे ३१ कोटींच्या घरात बचत ठेवी आहेत. बचत ठेवींचे हे प्रमाण अर्थ जगतासाठी लक्षणीय आहे. संस्थेच्या एकूण ठेवी ४०८ कोटी ८८ लाख झाल्या असून २०२६-२७ या आर्थिक वर्षात त्या ५०० कोटीपर्यंत पोहोचतील या दृष्टीने प्रयत्न राहणार आहेत. संस्थेचे कर्ज व्यवहारही ३०० कोटीं पलीकडे गेले असून संस्थेच्या आर्थिक शिस्तीच्या संस्कारातून उत्तम व्यवस्थापन व चोखंदळ कर्ज व्यवहार धोरण असल्याने व कर्जदारांच्या उत्तम सहकार्याने संस्थेची वसुली ९९.८२% अशी विक्रमी राखण्यात संस्था सातत्याने यशस्वी झाली आहे. संस्थेच्या ७ शाखांची वसुली १००% झाली असून अन्य शाखांमध्येही हाताच्या बोटावर मोजण्याइतके कर्जदार वगळता उत्तम वसुली व उत्तम नफा प्राप्त झाला आहे.








*विशाल आर्थिक परिवार*
संस्थेचा आर्थिक पाया सहकार तत्वानुरूप वृद्धिंगत होत असतांनाच ४९ हजार सभासदांचा हा एकजिनसी समूह झाला आहे. ४९ हजार सभासदांच्या सामूहीक ऊर्जेतून स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थविश्व अग्रेसर होत आहे हे विनम्रपणे नमूद केल्याशिवाय या यशोगाथेचे वर्णन पर्याप्त होणार नाही.
सभासद, संचालक, अधिकारी, कर्मचारी यांच्या सामूहीक प्रयत्नातून प्रतिवर्षी मिळणारे हे यश शक्य होते.
*स्वमालकीचे चार मजली कार्यालय*
नवीन आर्थिक वर्षात ५०० कोटींचा ठेव टप्पा खुणावतोय. सन २०२६-२७ आर्थिक वर्षात स्वमालकीच्या प्रशस्त ४ मजली इमारतीत नवी शाखा आणि प्रधान कार्यालय शानदारपणे प्रस्थापित करणे ही उद्दिष्टे ठेवली आहेत.
सर्वांच्या सहकार्याने, रचनात्मक सहयोगाने स्वरूपानंद पतसंस्था विश्वासार्हतेचा मार्ग, शिस्त, सचोटी, उत्तम ग्राहक सेवा या संस्कारांच्या बळावर स्वामींवरील श्रद्धा या उर्जेवर आपले अर्थकारण अधिक विस्तारित नेईल असा विश्वास देतो, असे सांगत सर्व सहकार्य करणारे कर्जदार, विश्वासाने गुंतवणूक करणारे ठेवीदार, सहकार खात्याचे अधिकारी, संबंधित सर्व यंत्रणा या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, असे ॲड.दीपक पटवर्धन म्हणाले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.