रत्नागिरी : येथील अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड, जांभूळआड येथील सुप्रसिद्ध शेतकरी जयंत फडके यांच्या शेतात भात लावणी उपक्रम राबवला.या उपक्रमात ४० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन भात रोपांची लावणी केली. शेतमजुरांच्या समस्यांची जाणीव होण्यासाठी व श्रमाचे महत्त्व समजून घेण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी श्रमदान करत शेतकऱ्यांना मदत केली व पर्यावरण व शेतीचे महत्व समजावले.
जयंत फडके यांनी या वेळी विद्यार्थ्यांना श्रमदानाचे महत्त्व पटवून दिले. संवाद साधताना ते म्हणाले की, एनएसएसमधून माणूस कसा घडतो, कॉलेज जीवन जरी संपले तरी आपल्याला एनएसएसमधून मिळणारे संस्कार माणुसकीची भावना जपता आलीच पाहिजे.
कार्यक्रमाचे नियोजन कॉलेजचे एनएसएस कार्यक्रमाधिकारी अभिजीत भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांना उपकार्यक्रम अधिकारी म्हणून श्री. भोईर, श्री. केळकर, सौ. पाटील, श्रीमती हजारे यांचे सहकार्य लाभले. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मार्गदर्शन लाभले.