रत्नागिरी : छत्रपती संभाजीनगर इथून रत्नागिरीत दाखल होत नितीन बागाटे यांनी शनिवारी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारतात रत्नागिरीत अमली पदार्थ विकणारी साखळी तोडून टाकणार असल्याचे सांगितले. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नितीन बगाटे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी २०२१ ते २०२३ याकाळात सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर काम केले आहे. मी रत्नागिरीतही दोन वेळा आलो आहे. त्यामुळे कोकण मला माहित आहे. मी यापूर्वी छत्रपती संभाजीनगर सारख्या अति संवेदनशील जिल्ह्यात काम केले आहे. तिथून मी शांतता असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात आलो आहे. रत्नागिरीची शांतता भंग होणार नाही, याकडे लक्ष दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच पोलिसांकडे येणाऱ्या तक्रारदाराशी व्यवस्थित संवाद साधला पाहिजे. कामात पारदर्शकता पाहिजे. एखाद्या घटनेनंतर तत्काळ प्रतिसाद देता आला पाहिजे, याकरिता मी प्रयत्नशील जाणार आहे असे बगाटे म्हणाले.



