रत्नागिरी : ग्राहकाला एकाच ठिकाणी, अनेक वस्तू, योग्य दरात मिळण्यासाठी कन्झ्युमर्स शॉपी हे गृहोपयोगी व गृहसजावटीच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री पटवर्धन हायस्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यांत आले आहे.
त्याचे उद्घाटन गुरुवारी झाले. रत्नागिरी शहरामध्ये गेली ३१ वर्ष सातत्याने कन्झ्युमर्स शॉपी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांच्या हस्ते झाले. यावेळी भारत शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे, उद्योजक आनंद देसाई, कौस्तुभ दीक्षित, चिन्मय सरदेशपांडे व विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे संयोजिका मीनल मोहाडीकर यांनी स्वागत केले.
या प्रदर्शनात भारतातील अनेक नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे. या मोठ्या कंपन्यांबरोबरच महिला व लघुउद्योजक ही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या आहेत. विविध कंपन्या आपल्या उत्पादनांची विक्री करीत असताना प्रात्यक्षिके दाखवून ग्राहकांच्या शंकांचे निरसनही करीत आहेत. कन्झ्युमर्स शॉपी येत्या १४ एप्रिलपर्यंत रोज सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत सर्वांना विनामूल्य खुले आहे.