राजापूर: सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पुरातत्व आणि कातळशिल्प संशोधक सतीश लळीत यांनी संशोधित केलेल्या कोकणातील पहिल्या महापाषाण संस्कृतीकालीन एकाश्मस्तंभ स्मारकांच्या जतन आणि संवर्धनासाठी राजापूर-लंजा-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. तालुक्यातील कुंभवडे येथील आढळलेल्या एकाश्मस्तंभ स्मारकांच्या जतन आणि संवर्धनासह त्याठिकाणी मुलभूत सुविधांच्या उभारणीचा प्रस्ताव प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गंत शासनाला सादर करण्याचे आमदार श्री. सामंत यांनी जिल्हाधिकार्यांना सुचित केले आहे. त्या माध्यमातून आता कोकणच्या प्राचीन इतिहासाचा उलगडा करणार्या एकाश्मस्तंभाचे जतन आणि संवर्धन होणार आहे.
इसपू 1500 ते 400 वर्षे हा महापाषाण संस्कृतीचा (मेगालिथिक कल्चर) काळ मानला जात असून हा मानवी विकासाच्या वाटचालीतील एक महत्वाचा कालखंड मानला जात आहे. याच काळातील एकाश्मस्तंभ कातळशिल्प संशोधक श्री. लळीत यांनी केलेल्या संशोधनामध्ये तालुक्यातील कुंभवडे येथे आढळून आले आहेत. हे सात एकाश्मस्तंभ श्री गंभीरेश्वर मंदिर (गांगो मंदिर) परिसरात तीन गटात विभागलेले आहेत. सात स्तंभांपैकी पाच उभ्या स्थितीत असून दोन निखळून पडलेल्या आडव्या स्थितीत आहेत. मंदिरासमोरुन नाणार फाटा – कुंभवडे – उपळे जाणार्या रस्त्यावर मंदिराकडे वळणार्या फाट्यावर दोन स्तंभ आहेत. मध्यम आकाराचा एक स्तंभ उभा असून दुसरा मोठ्या आकाराचा स्तंभ आडवा पडला आहे. याच रस्त्याने सुमारे तिनशे मीटर पुढे गेल्यावर रस्त्याच्या कडेला पाण्याच्या टाकीजवळ एक मध्यम आकाराचा पाषाणस्तंभ उभ्या स्थितीत आहे. मंदिराच्या पश्चिम बाजुला सुमारे तिनशे मीटर अंतरावर असलेल्या एका मळ्यात एकुण चार पाषाणस्तंभ पहायला मिळतात. यापैकी दोन लहान आकाराचे, एक मध्यम आकाराचा तर एक मोठ्या आकाराचा आहे. या चार पाषाणस्तंभापैकी लहान आकाराचा एक आडवा पडलेला असुन तीन उभ्या स्थितीत आहेत. महापाषाणकालीन एकाश्मस्तंभ महापाषाण काळात पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या मानवी समुहांच्या, तत्कालीन संस्कृतींच्या चालीरीती, श्रद्धा, उपासना पद्धती यांच्या अभ्यासात महत्वाचा दुवा ठरणार असल्याने त्यांचे शासनाने जतन अन् संवर्धन करताना ही ठिकाणे राज्य संरक्षित स्मारके म्हणून जाहीर करावीत अशी अपेक्षा संशोधक श्री. लळीत यांनी व्यक्त केली होती. याची दखल घेत आमदार श्री. सामंत यांनी या एकाश्मस्तंभांच्या जतन आणि संवर्धनासह या ठिकाणी मुलभूत सोयीसुविधांच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे.