Monday, March 23, 2026

Latest Posts

कोकणचा साज-संगमेश्वरी बाज’च्या सेक्रेटरी सचिन काळे यांची ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात निवड

रत्नागिरी:   रत्नागिरी जिल्ह्यातील सवे गावचा सुपुत्र, हरहुन्नरी कलाकार, संगमेश्वरी बोलीभाषेतील कवी आणि कोकणचा साज- संगमेश्वरी बाज या लोकप्रिय लोकनाट्य समूहाचे सेक्रेटरी सचिन काळे यांची झी मराठीवरील प्रचंड लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या सीझनमध्ये निवड झाल्याची आनंददायक बातमी आहे.

सचिन काळे हे गेल्या काही वर्षांपासून संगमेश्वरी बोली, कोकणातील लोककला आणि हास्यनाट्य या क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी कोकणचा साज- संगमेश्वरी बाज या नाट्यप्रयोगातून कोकणातील जनतेला खळखळून हसवले आहे आणि बोलीभाषेला मंच मिळवून दिला आहे.
आता ते चला हवा येऊ द्यामध्ये आपला विनोदी अभिनय सादर करताना दिसणार आहेत. हसवणूक आणि संदेश याचा सुंदर मेळ साधणाऱ्या त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती लाभेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सचिन काळे यांनी रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे९९’ या मराठी चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तसेच त्यांनी झी मराठीवरील एका स्कीटमध्ये अभिनेता ओंकार भोजने यांच्यासोबतही अभिनय केला होता.
या यशाबद्दल बोलताना सचिन काळे म्हणाले, “कोकणातील बोलीभाषा, हास्य आणि संस्कृती यांना मोठ्या व्यासपीठावर पोहोचवणे, हा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. चला हवा येऊ द्या हा मंच मिळणे, हे माझ्यासाठी सन्मानास्पद आहे. हे यश केवळ माझे नसून, कोकणातील सर्व लोककलेच्या कार्यकर्त्यांचे आहे.”
त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण कोकणात आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात अभिनंदनाची लाट उसळली आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, प्रेक्षकांनीही शनिवार आणि रविवार, २६ जुलैपासून हा कार्यक्रम आवर्जून पाहावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.