Wednesday, July 30, 2025

Latest Posts

खंडाळा येथे २६ रोजी प्रकल्प हवेत अशा शेतकऱ्यांचा मेळावा घेणार – मंत्री उदय सामंत

रत्नागिरी : वाटद एमआयडीसी येथे धीरुभाई अंबानी डिफेन्ससह अन्य प्रदूषणमुक्त उद्योग येणार आहेत. वाटदमध्ये विरोध करणार्‍या काही लोकांचे स्वत:चे इंटरेस्ट आहेत. परंतु एमआयडीसी हवी असणार्‍या शेतकरी आणि ग्रामस्थांनी शनिवार २६ जुलै रोजी सायंकाळी ५ वा. बैठकीचे आयोजन केले असून, या बैठकीला मला निमंत्रित केले असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी  दौर्‍यावर आलेल्या पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, वाटद येथील शेतकरी, सात ते आठ गावचे सरपंच आपल्याला येऊन भेटले व वाटद एमआयडीसी झाली पाहिजे. येथील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, अशी भूमिका मांडली. वाटद एमआयडीसीला विरोध करणार्‍यांमध्ये काही लोकांचे वेगळे इंटरेस्ट आहेत असे ते म्हणाले. शनिवारी स्थानिक ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या या सभेत आपण येणार आहोत. ही एमआयडीसी स्थानिकांना विश्वासात घेऊन केली जाणार आहे. उद्योग आणतानाही प्रदूषणमुक्त प्रकल्प आणले जाणार आहेत.
या सभेत कोणकोणत्या शेतकर्‍यांनी किती जमीन दिली आहे, याची माहिती मांडली जाईल. एमआयडीसीला विरोध करणार्‍या सभेसाठी अ‍ॅड. असीम सरोदे उपस्थित होते. ते आपले मित्र असून, त्यांना काही लोकांनी चुकीची माहिती दिल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. त्यामुळे, खरी वस्तुस्थिती सरोदे यांच्यासमोर मांडण्यात यावी, अशी सूचना त्यांनी प्रांताधिकार्‍यांना केली आहे. जे आंदोलनात उतरले होते, त्यांनी आपणास आणि एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना किती वेळा भेटून काय मागण्या केल्या होत्या, हे अजून आपण शेतकर्‍यांना सांगितले नसल्याचे ना. सामंत म्हणाले. हे सर्व आपण शनिवारच्या सभेत पुराव्यानिशी मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकर्‍यांना विश्वासात घेऊनच सर्व निर्णय घेतले जातील आणि एक टक्काही अन्याय शेतकर्‍यांवर होऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. आपल्या मतदार संघात सध्या ३० हजार कोटीचे प्रकल्प येणार आहेत. त्यामुळे किमान ३० हजार लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वाटद येथील माजी जि.प. सदस्य बाबू पाटील, २२ खेडे बहुजन संघाचे अध्यक्ष भाई जाधव, विष्णू पवार, माजी समाजकल्याण सभापती शरद चव्हाण, योगेंद्र कल्याणकर, बापू भोसले, अनिकेत सुर्वे, नामदेव चौघुले, सुजित दुर्गवली, सुयोग आढाव, प्रकाश वीर, संतोष सुर्वे, बाळू पाष्टे, संतोष तांबटकर यांच्यास अनेक ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी भेट घेतली.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.