मुंबई : सणांच्या काळात महिला पोलिस कर्मचारी आपल्या कुटुंबापासून दूर राहून, दिवस-रात्र जनतेची सेवा व संरक्षण करण्याचे कर्तव्य पार पाडत असतात. आपण सर्वजण आपल्या कुटुंबासोबत सण साजरे करतो, याच भावनेतून आज गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात महिला पोलिस कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरे केले. या प्रसंगी त्यांनी सांगितले की, “मी ज्या विभागाचे नेतृत्व करतो, त्या विभागातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांना एक विश्वास द्यावा, की भाऊ म्हणून आम्ही कायम त्यांच्या सोबत आहोत. पोलिस कर्मचारी म्हणून त्या जनतेची सेवा आणि रक्षा करत असतात, तर एक भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर आहोत.” काही महिलांनी आपल्या भावाला गावी पोस्टाने राखी पाठवली होती, तर काही महिलांना सख्खा भाऊ देखील नव्हता. आजच्या या रक्षाबंधन सोहळ्यात सहभागी होऊन, त्यांना जणू त्यांचा भाऊ प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद झाला. राखी बांधताना महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवेत येणाऱ्या आव्हानांविषयी आणि अनुभवांविषयी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या अडचणी ऐकून, शक्य त्या सर्व सोयी-सुविधा पुरविण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची ग्वाही श्री. कदम यांनी दिली. कार्यक्रम हसत-खेळत, आपुलकी आणि भावनिक वातावरणात पार पडला. मुंबई पोलिस दलाच्या कार्यकुशलतेचे कौतुक करताना दादांनी सांगितले की, “मुंबई पोलिस हे केवळ शहराच्या सुरक्षेचे बळ नाही, तर आपल्या समाजातील विश्वासाचा आधारस्तंभ आहेत.





