रत्नागिरी: कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. घरोघरी गणेश मूर्ती आणली जात असल्यामुळे नोकरी व्यवसायासाठी मुंबई, पुण्यात असलेली मंडळी आवर्जून गावाकडे येतात. यावर्षी मुंबईकरांना घेऊन ५,००० ज्यादा गाड्या कोकणात येणार आहे. गावी आलेल्या मुंबईकरांचा परतीचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी रत्नागिरी विभागाकडून सद्यस्थितीत २,५०० ज्यादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या बसेसचे ग्रुप बुकिंगचे आरक्षण दि. २२ जुलैपासून सुरू होणार आहे. दि. २३ ऑगस्ट पासून मुंबई ठाणे पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकून कोकणासाठी ज्यादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. महिलांसाठी व ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना तिकीट दरात ५० टक्के, तर ७५ वर्षांवरील अमृत जेष्ठ नागरिकांसाठी तिकीट दरात १०० टक्के सवलत दिली जाणार आहे बस आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संबंधित बस आरक्षण बस स्थानकावर किंवा महामंडळाचा MSRTC Bus Reservation ॲप द्वारे उपलब्ध होणार आहे.
गणेशोत्सव कालावधीत एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बस स्थानक बस थांब्यांवर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथक तैनात करण्यात येणार आहे मुंबईहून येणाऱ्या बस चालकांना मार्ग नवीन असल्यामुळे दिशा दाखवण्यासाठी खास पथक कार्यरत राहणार आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबईतून येणाऱ्या व गणेशोत्सव साजरा करून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटीची जादा वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवासांसाठी ऑनलाईन तिकीट आरक्षण सुविधा उपलब्ध असून प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा.
-प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक रत्नागिरी