रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या ९२ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. येत्या गुरुवारी दि. २७ मार्च रोजी हा कार्यक्रम मंडळाच्या जोशी पाळंद येथील भगवान परशुराम सभागृहात होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुण्या डॉ. प्रज्ञा नारायण गोखले, तसेच मंडळाचे अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर, उपाध्यक्ष स्मिता परांजपे, कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन, सहकार्यवाह अनंत आगाशे व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मंडळाचा (कै.) सुधा वसंत बडे पुरस्कार तिघींना देण्यात येणार आहे. सन्मानपत्र, साडी, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गेली २५ वर्षे बडे पुरस्कार प्रदान केला जात आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सौ. सुवर्णा नारायण वैशंपायन, अभिनेत्री, कृषी उद्योजिका सौ. संपदा जोगळेकर-कुळकर्णी, राजापूरच्या डॉ. नेहा करंदीकर-जोशी यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. सौ. वैशंपायन यांनी राम जन्मभूमी लढ्यात सहभाग घेतला. समोज प्रबोधनासाठी सक्रिय सहभाग, बागेश्री भजन मंडळात सक्रिय आहेत. अभिनेत्री संपदा जोगळेकर या मालिका, रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्री असून लेखन, दिग्दर्शन यातही हातखंडा आहे. तसेच कृषी पर्यटन उद्योजिका म्हणून सुप्रसिद्ध आहेत. डॉ. जोशी या एमडी आयुर्वेद असून आयुर्वेद कंपनीच्या सीईओ आहेत. त्या कोकणातल्या शेतकऱ्यांकडून खोबरेल तेल, कोकण बटर हे रॉ मटेरियल घेऊन स्किन केअर, हेअर केअर व मेक अप प्रॉडक्टस् बनवतात.
संस्कृतप्रेमी पुरस्कार शालेय संस्कृत व्याकरणच्या लेखिका, संगीत विशारद सौ. दीप्ती गौरांग आगाशे यांना प्रदान करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर शौर्य पुरस्कार दोन जणांना प्रदान केला जाणार आहे. प्रत्येकी ४ हजार रुपये, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पहिली मानकरी इयत्ता पाचवीत शिकणारी गिर्यारोहक ग्रिहिथा सचिन विचारे (मुळची गुहागर येथील, सध्या सरस्वती विद्यालय, घोडबंदर, ठाणे) हिला देऊन गौरवण्यात येणार आहे. दुसरे मानकरी आतापर्यंत १२५ गडकिल्ले सर करत निसर्ग भटकंती करणारे प्रथमेश काशिनाथ वालम (पडवे, गुहागर) यांना दिला जाणार आहे.
समशेरबहाद्दर पुरस्काराचे गुरुवर्य दादोजी कोंडदेव शाळा (तासगा, सांगली) येथील बेस्ट कॅडेट सार्थक संदेश पाटील याला दिला जाणार आहे. त्यानेही आतापर्यंत २५० गटकोट सर करत गडसंवर्धनात हातभार लावला आहे. या पुरस्काराचे स्वरूप सहा हजार रुपये, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ असे आहे.
मंडळाचा जीवनगौरव पुरस्कार रत्नागिरीच्या कबड्डी, कुस्ती, शरीरसौष्ठव या क्रीडा प्रकारात दबदबा निर्माण करणारे ८० वर्षांचे श्रीकृष्ण हरिश्चंद्र तथा भाई विलणकर यांना सन्मानपूर्वक दिला जाणार आहे. त्यांनी क्रीडा क्षेत्रात खूप नावलौकिक मिळवला आहे. झुंजार युवक मंडळाच्या माध्यमातून मित्र सदानंद जोशी यांच्या सहकार्यातून त्यांनी कबड्डी, कुस्तीत खेळाडू तयार केले, घडवले. त्यांनी व्यायामासाठी आयुष्य वेचले आहे.
समाजभूषण पुरस्कार शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांना प्रदान केला जाणार आहे. राष्ट्र हाच देव व राष्ट्रसेवा हीच परमेश्वराची पूजा हे तत्व पाळून ते विविध उपक्रम राबवत आहेत.
सेवागौरव पुरस्कार पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळात ४२ वर्षे सेवा देणारे धनंजय वामन देशमुख, तसेच विशेष सत्कार प्रमुख पाहुण्या डॉ. प्रज्ञा गोखले यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअर विभागात डॉक्टरेट मिळवल्याबद्दल, तसेच वैद्य कुटुंबातील पाचव्या सीए सौ. मयुरी चैतन्य वैद्य, सामाजिक कार्यकर्त्या शुभदा साठे, कोतवडे येथे गावी राहून फक्त ऑनलाइन मार्गदर्शनाद्वारे सीए झालेले संकेत चंद्रकांत परांजपे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
बारावीमध्ये संस्कृत, गणित विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक पारितोषिक, बीएला मराठी व समाजशास्त्र प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना कै. केशव अच्युत जोशी व कै. सुलोचना केशव जोशी स्मृती पारितोषिक प्रदान करण्यात येईल. हिंदू समाजाच्या जनजागृतीसाठी अनेक वर्षे तळमळीने कार्य करणाऱ्या सकल हिंदू समाजाचे संजय जोशी, राकेश नलावडे, चंद्रकांत राऊळ, कौस्तुभ सावंत व सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. आदर्श विद्यार्थी, विद्यार्थिनी मंडळाच्या सभासदांना ७५ वर्षे पूर्ण झाली आहे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. मंडळाच्या कै. ल. वि. केळकर विद्यार्थी वसतीगृहातील आदर्श विद्यार्थी अमोल प्रसाद मुळ्ये व कै. आनंदीबाई त्रि. केळकर विद्यार्थिनी वसतीगृहातील आदर्श विद्यार्थिनी आर्या संजय दाते यांना सन्मानित करण्यात येणार आहे. कै. सत्यभामाबाई फडके निधीतून शुभदा गोडबोले यांना आर्थिक मदत केली जाणार आहे.