चिपळूण: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली चिपळूण तालुक्यात “सामाजिक सलोखा समिती” ची महत्त्वपूर्ण बैठक काल, १३ जून २०२५ रोजी “श्री. बाळासाहेब माटे सभागृह”, चिपळूण येथे संपन्न झाली. यावेळी जनतेचा दरबारही भरवण्यात आला होता, ज्यात सुमारे ४५० ते ५०० नागरिक उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी २८ मे २०२५ रोजीच सर्व पोलीस ठाणे स्तरावर “सामाजिक सलोखा समिती” स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. याच अनुषंगाने चिपळूण पोलीस ठाण्यामार्फत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीच्या सुरुवातीला उपविभागीय पोलीस अधिकारी, चिपळूण उपविभाग श्री. राजेंद्र राजमाने यांनी चिपळूण उपविभागाची भौगोलिक परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर माजी आमदार श्री. सदानंद चव्हाण, श्री. प्रशांत यादव आणि श्री. शौकत मुकादम यांसारख्या मान्यवरांनी चिपळूण तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक सलोखा राखण्याबाबत आपले विचार मांडले.
पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी उपस्थित जनसमुदायाच्या समस्या व सूचना जाणून घेतल्या. जनतेने पोलीस विभागाशी संबंधित अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षकांनी या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. रत्नागिरी जिल्हा “अमली पदार्थ मुक्त” करणार असल्याची आणि अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील वाहतुकीची समस्या सोडवण्याबाबत आणि महिला सुरक्षेला महत्त्व देऊन आवश्यक उपाययोजना करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला चिपळूण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. फुलचंद मेंगडे, गुहागर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. नितीन सावंत, सावर्डे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. आबासो पाटील आणि अलोरे शिरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. भरत पाटील हे उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी चिपळूण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. फुलचंद मेंगडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. या बैठकीमुळे लोकांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असून, तेथे जनता आपले थेट प्रश्न उपस्थित करू शकली. या बैठकीला राजकीय व सामाजिक नेते, पत्रकार, व्यापारी संघटना, महिला संघटना, विविध गावांचे पोलीस पाटील, वकील तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



