रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर हा महत्वपूर्ण उपक्रम सुरु आहे. शासन आपल्या दारी ही संकल्पना वापरुन ग्रामस्थांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात येत आहे. याअंतर्गत वाटद खंडाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ३०२ विविध प्रकारच्या दाखल्यांचे ग्रामस्थांना वाटप करण्यात आले.
ग्रामस्थांना विविध दाखल्यांचे वाटप या शिबीरांतर्गत करण्यात येत असून दिनांक १५ मे पर्यंत हा उपक्रम सुरु राहणार आहे. या शिबीराचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी जिवन देसाई यांनी केले आहे. खंडाळा येथे आयोजित समाधान शिबीराचे उद्घाटन महसूल नायब तहसिलदार रिद्धी गोरे, पंचायत समिती सदस्या संजना माने यांच्याहस्ते दिप प्रज्वलाने झाले. यावेळी तहसिलदार राजाराम म्हात्रे, नायब तहसिलदार माधवी कांबळे, जिल्हा परिषद सदस्या उषा सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद पाटील तसेच जयगड पंचक्रोशीतील आजी माजी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील उपस्थित होते.
या शिबीरामध्ये जयगड, नांदिवडे, चाफेली, वाटद, सैतवडे, जांभारी या सहा सज्जाती ग्रामस्थांना विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. ४७५ ग्रामस्थांनी विविध दाखल्यांची मागणी केली होती. त्यापैकी ३०२ दाखल्यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांसाठी लागणारे विविध दाखले, उत्पन्न दाखला, अधिवास दाखला, जातीचा दाखला, नॉनक्रिमिलिअर दाखला, संजय गांधी योजना, रेशनकार्ड बाबत कामे, आरोग्यविषयक योजना, कृषी विषयक योजना, आधारकार्ड अपडेट तसेच सातबारामधील इतर हक्कात असलेले तगाई बोजा, तुकडेबंदी, तुकडे जोड शेरा, भोगवटदार वर्ग १ करणेबाबत, वारसतपास, इतर मागास बहुजन समाज कल्याण, भूमी अभिलेख याबाबत विविध अर्जांची दखल घेत दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
सुत्रसंचलन अनिकेत सुर्वे व आभार प्रदर्शन जयगडचे मंडळ अधिकारी सर्फराज संदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयगड मंडळातील ग्राम महसुल अधिकारी श्रद्धा दैत, पुजा मोरे, प्रदिप लोखंडे, संजय सावंत, महसुल सेवक दिपक गमरे, प्रांती खेडेकर, जितेंद्र आढाव, संदेश डोर्लेकर, मंदार सुर्वे यांनी विशेष परिश्रम घेतले.



