रत्नागिरी ः जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे विणले जात असतानाच अपघातांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. रस्ते रूंद झाले तरीही वाढणाऱ्या वेगामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2025 अखेर जिल्ह्यात 127 अपघातांमध्ये 137 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 115 पुरूषांसह 22 महिलांचा समावेश आहे. त्यातील सर्वाधिक अपघात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर झाले आहेत. याला रस्त्याचे रखडलेले कामही कारणीभूत ठरत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते वळणावळणाचे आहेत. अवघड वळणांवर होणारे अपघात टाळण्यासाठी सुमारे 20 वर्षांपूव मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील रस्त्याचे काम अद्यापही अपूर्णच आहे. त्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2025 या 14 महिन्यांच्या कालावधीत 127 अपघात जिल्ह्यात झाले असून त्यातील सर्वाधिक अपघात मुंबई-गोवा महामार्गावर झाले आहेत. त्यामध्ये 137 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
याच कालावधीत 119 छोटे अपघात झाले असून त्यामध्ये 292 जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये 210 पुरूषांसह 82 महिलांचा समावेश आहे. छोट्या 89 अपघातांमध्ये 264 जणांना दुखापत झाली आहे. त्यामध्ये 187 पुरूष तर 77 महिलांचा समावेश आहे. तर 64 अपघातांमध्ये केवळ वाहनांचे नुकसान झाले असून चालक जखमी झालेले नाहीत.
महामार्ग चौपदरीकरणानंतर अपघातांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. यासाठी महामार्गाच्या दोन्ही मार्गिका सुरू होण्याची आवश्यकता आहे. 2025 डिसेंबर अखेर महामार्ग पूर्ण करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. परंतु यामध्ये सरकारला किती यश येते हे येत्या दहा महिन्यात स्पष्ट होणार आहे.



