Saturday, February 14, 2026

Latest Posts

‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून सव्वा कोटी लुटणारा भामटा रत्नागिरी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

रत्नागिरी: बेंगलोर पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली १ कोटी २३ लाख रुपयांना लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीतील एका आरोपीला जेरबंद करण्यात रत्नागिरी सायबर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीने फिर्यादी यांच्या मुंबईतील माटुंगा येथील कॅनरा बँक खात्यातून ३ कोटी रुपयांचा फ्रॉड झाल्याची खोटी भीती घातली होती. ४ नोव्हेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत वेळोवेळी पैशांची मागणी करून फिर्यादीची मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली.
याप्रकरणी सायबर पोलीस ठाणे रत्नागिरी येथे भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि बँकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सायबर पोलिसांचे पथक मुंबई व ठाणे येथे रवाना झाले होते. स्थानिक बातमीदारांच्या मदतीने सापळा रचून २३ जानेवारी २०२६ रोजी एका आरोपीला मुंबईतून ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने या आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस निरीक्षक स्मिता सुतार आणि त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या पार्श्वभूमीवर, कोणताही शासकीय विभाग फोनवर चौकशीच्या नावाखाली पैशांची मागणी करत नाही, त्यामुळे नागरिकांनी अशा धमक्यांना बळी पडू नये आणि आपली गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.पोलिस निरीक्षक स्मिता सुतार, पोलिस हेडकॉन्स्टेबल संदीप नाईक, पोलीस कॉन्स्टेबल अजिंक्य ढमढेरे, सौरभ कदम ,रोहन कदम, निलेश शेलार यांनी ही कारवाई केली आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.