Saturday, March 21, 2026

Latest Posts

दिव्यांगांना झाले संवेदनशील अधिकाऱ्याचे दर्शन

रत्नागिरी : दिव्यांग बांधवांवरील छळ, हिंसा, भेदभाव तसेच हक्क नाकारणाऱ्या घटनांवर शून्य सहनशीलतेची भूमिका घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रीय अपंग विकास महासंघाने सोमवारी (दि. १५ डिसेंबर) जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांना दिले. यावेळी त्यांनी निवेदनकर्त्यांचा आदर करीत त्यांना खुर्चीत बसवून स्वत: त्यांच्याजवळ जाऊन उभे राहून निवेदन स्वीकारले. या निवेदनकर्त्यांना संवेदनशील पोलिस अधीक्षकाचे दर्शन यावेळी घडले.राज्य शासनाने १३ नोव्हेंबर २०२४ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार दिव्यांग कल्याण विभागाने लागू केलेल्या एकसमान कार्यपद्धती (SOP) नुसार दिव्यांग व्यक्तींवरील छळ, मारहाण, भेदभाव, शोषण व हक्क नाकारणे हे गंभीर गुन्हे ठरविण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात ग्रामीण व शहरी भागांत दिव्यांग व्यक्तींना अपमान, अडथळे, धमक्या तसेच मानसिक व शारीरिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलास विशेष आदेश जारी करणे, प्रत्येक पोलिस ठाण्यात दिव्यांग संरक्षण नोंदणी सुरू करणे, तक्रारींवर २४ तासांत प्राथमिक चौकशी, पीडित दिव्यांगांसाठी तातडीचे संरक्षण उपाय, एफआयआर नोंदविण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, तसेच जिल्हास्तरावर विशेष पोलिस मॉनिटरिंग सेल स्थापन कराव्यात. ग्रामपातळीवर जनजागृती व समुपदेशन मोहीम राबविण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन सोमवारी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाने जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांना दिले. या महासंघाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षक बगाटे यांच्या केबिनमध्ये प्रवेश करताच, बगाटे खुर्चीत बसून न राहता पुढे आले आणि सन्मानाने त्यांचे स्वागत केले. यावेळी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षकांसोबत चर्चा केली. दिव्यांग बांधवांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी त्यांच्या मागण्यांवर तातडीने ठोस भूमिका घेऊन जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना स्पष्ट आदेश देण्यात येतील, असे आश्वासन बगाटे यांनी दिले. पोलिस अधीक्षकांनी दिव्यांग व्यक्तींना सन्मानपूर्वक वागणूक देत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यातून या दिव्यांगांना एका संवेदनशील अधिकाऱ्याचे दर्शन झाले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.