रत्नागिरी : दी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते गुरूदेव श्री श्री रविशंकरजी हे कोकणच्या इतिहासात प्रथमच २२ जानेवारी रोजी रत्नागिरी शहरात येत असून, त्यांच्या उपस्थितीत सायंकाळी ६ ते ८ यावेळेत गोगटे कॉलेज मैदान येथे भव्य अशा भक्ती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ॲड. सौ. जया सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
गुरूदेव श्री श्री रविशंकरजी यांनी प्राणायाम, ध्यान, योग सारख्या भारतीय संस्कृती मूल्यांचा आविष्कार घडवत प्रत्येक मनुष्याला निर्भय बनवले असून त्यांनी सुदर्शन क्रियेसारख्या वैशिष्ट्यपूर्ण तत्वाचा एक क्रांतीकारक शोध घेत सुदर्शन क्रियेद्वारे अवघ्या विश्वाला तणावमुक्त केले आहे.
वसुधेव कुटुम्बकम या प्राचीन मंत्र नव्याने जागवून त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून भारतासह १८० देशांत कार्य सुरू ठेवले आहे. गुरूदेव श्री श्री रविशंकरजी यांना देशातील व अन्य देशांतील मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. रत्नागिरीतही गेली अनेक वर्षे आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्य सुरू असून त्याचा फायदा अनेक जणांनी घेतला आहे.
गुरूदेव श्री श्री रविशंकरजी यांचे देशातील मोठ्या शहरात सत्संग होत असले, तरी कोकणात प्रथमच रत्नागिरी शहरातील गोगटे कॉलेज मैदानावर २२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ज्ञान, ध्यान व भजन असा सत्संगाचा भव्य भक्तीउत्सव सोहळा होणार आहे. गुरूदेव श्री श्री रविशंकरजी यांचे दर्शन घेण्याचे भाग्य रत्नागिरीकरांना लाभणार असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी दी आर्ट ऑफ लिव्हिंगची टीम कार्यरत झाली आहे.
या भव्य कार्यक्रमासाठी अंदाजे २० ते २५ हजार लोक उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच संपूर्ण राज्यभरातून भक्तगण या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे जया सामंत यांनी सांगितले. या कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत यांचे मोठे सहकार्य लाभले आहे. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकजण आपणहून पुढे येत आहेत.
गुरूदेव श्री श्री रविशंकरजी यांचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी रत्नागिरीकरांनी या न भुतो न भविष्यती कार्यक्रमात सहभागी होवून गुरूदेवांच्या दिव्य अस्तित्वाची अनुभुती घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या पत्रकार परिषदेला दी आर्ट ऑफ लिव्हिंग टीमच्या विनिता गोखले, भुवना महागांवकर, प्राची देशपांडे, प्राची जोशी, राजेश भुर्के, नीलेश मिरजकर, प्रवीण डोंगरे, श्वेता भट, ओंकार फडके आदी मान्यवर उपस्थित होते.



