रत्नागिरी: दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह गुरुवारी दुपारी 3 वा.सुमारास भगवती बंदर येथील शिवसृष्टीच्या बाजुस असलेल्या टेबल पॉईंटच्या कठ्डयाखाली मिळून आला. या तरुणाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अमोल संजय किड्ये (30,रा.मांडवी वरचीवाडी,रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. अमोल किड्ये हा मंगळवार 7 एप्रिल रोजी घरात कोणालाही न सांगता घरातून बाहेर निघून गेला होता. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा आजुबाजुला शोध घेउन अखेर त्याची आई संगती संजय किड्ये यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची खबर दिली होती. खबरीवरुन शहर पोलिस अमोलचा शोध घेत होते. दरम्यान, गुरुवार 9 एप्रिल रोजी दुपारी 1 वा.सुमारास भगवती बंदर येथील टेबल पॉईंटच्या खाली काही नागरिकांना एका तरुणाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तातडीने याबाबत शहर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस हवालदार कुशल हातीसकर आणि अमोल भोसले यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह वरती काढण्यासाठी रत्नदुर्ग मॉउंटेनिअर्सला पाचारण केले. रत्नदुर्ग मॉउंटेनिअर्सच्या किशोर सावंत,गौतम बाष्टे,शैलेश नार्वेकर,आनंद किर, ओंकार शिवलकर, अक्षय बोरसूडकर,विरेंद्र वणजू ,साई खेउर आणि तनिष्क सावंत या सदस्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी अमोलच्या नातेवाईकांना बोलावून घेतले असता अमोलचा सख्खा भाउ आशिष किड्येने मृतदेह पाहिल्यावर तो अमोलचाच असल्याचे ओळखले. शहर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्याची कार्यवाहि सुरु होती.



