रत्नागिरी : हिंदू-मुस्लिम भाविकांच्या ऐकायचे प्रतिक असलेल्या नेवरे येथील शेखपीरवली बाबांचा ऊरूस शनिवार १५ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. उर्सानिमित्त बी. के. वालावलकर रूग्णालय डेरवण, शेखपीरवली बाबा ऊर्स कमिटी नेवरे व मुंबई, जमातुल मुस्लिमीन नेवरे व एकनाथ शिेंदे शिवसेना शाखा नेवरे यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबीर व मौफत शस्त्रक्रिया नोंदणी शिबीर तसेच रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
तालुक्यातील नेवरे येथे शेखपीरवली बाबांचा ऊरूस दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी महाआरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. रविवार दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उत्कर्ष मंडळ नेवरे बाजारपेठ येथे शिबीर होणार आहे. या शिबिरात बी. के. वालावलकर रूग्णालयाचे जनरल सर्जन, स्त्रीरोग तज्ञ, जनरल फिजिशियन, नाक-कान-घसा तज्ञ, अस्थीरोग तज्ञ उपस्थित राहून रूग्णांची तपासणी करणार आहेत. इन्फिगाे रूग्णालयाचे नेत्रतज्ञ रूग्णांची तपासणी करणार आहेत. सध्या रक्ताचा तुटवडा रूग्णालयातून भासत असल्यामुळे सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबीरही आयोजित केले आहे. रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयातील रक्तपेढीची टीम येणार आहे. महाआरोग्य शिबीरावेळी मोफत शस्त्रक्रिया बाबत नोंदणी करून घेतली जाणार आहे. त्यामध्ये अॅजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोग शस्त्रक्रिया, मुतखडा, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट ग्रंथी, मोतीबिंदू, नाक-कान-घसा शस्त्रक्रिया, इम्प्लांट रीमोवल, मणक्यावरील शस्त्रक्रियाबाबत नोंदणी होणार आहे.
रूग्णालयातर्फे अल्पदरात केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेसाठीही नोंदणी करून घेतली जाणार आहे. त्यामध्ये थायराॅईड, अपेंडिस, गुडघे व हीप बदलणे, टाॅन्सील्स, चरबीच्या गाठी, स्तनातील गाठी, महिलांचे गर्भाशयांचे आजार, हायड्रोजेल, मूळव्याध या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. तरी नेवरे, धामणसे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.