चिपळूण: निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांच्याकडे भरपूर पैसा व दागिने असल्याचे समज करून टूर एजंटने त्यांची हत्या केली असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. टूर एजंट जयेश गोंधळेकर याला अटक करण्यात आली असून, त्याच्या घरातून काही रक्कम व दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांच्या खून प्रकरणा मागे पैसा हेच मुख्य कारण आहे. त्यांच्या घरातून २७ हजार रुपये व काही दागिने चोरीला गेले होते. यातील काही रक्कम जयेश याच्या घरी सापडली आहे. काही दागिनेही पोलिसांनी हस्तगत केले आहेत. आता उर्वरित दागिने आणि पळून गेल्या साथीदार शोधण्याचा कामाला गती देण्यात आली आहे. खून झाला ते उघड झाले तेव्हापासून खूना मागचे कारण आणि खून करणाऱ्या आरोपी या दोन्हींबाबत पोलिसांसमोर प्रश्नचिन्ह होते. मात्र, सतत फिरण्याची आवड लक्षात घेता पोलिसांनी त्यादृष्टीनेही चौकशी केली. त्यातून हे प्रकरण उलगडले आणि पैसे दागिन्यांसाठीच आपण हा खून केल्याची कबुली प्रमुख संशयित आरोपीने पोलिसांनी दिली.
सीसीटीव्हीचा फायदा
चिपळूण शहरात पोलीस यंत्रणा व नगर परिषदेने नुकतेच ८८ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मुख्य व अंतर्गत भागातील सर्व रस्ते आता कॅमेऱ्यांच्या निगराणीत असल्याने या प्रकरणात शोध घेताना पोलिसांना खूप मोठी मदत झाली.
पोलिसांना बक्षीस
या प्रकरणात अहोरात्र तपास करून अवघ्या 48 तासात मुख्य संस्थेत आरोपीच्या मुस्क्या आवडणाऱ्या पोलीस पथकाचे कौतुक करत या पथकाला २५ हजार रुपयांचे रोख बक्षिसही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जाहीर केले. तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांचे हा प्रकारात महत्त्वाचे योगदान होते. त्यामुळे त्यांनाही १० हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.




