Monday, March 23, 2026

Latest Posts

फुलण्याआधीच कोमेजला ‘त्यां’ चा संसार!

चिपळूण : दहावीनंतर शिक्षणासाठी धुळ्याहून चिपळुणात आलेल्या निलेश आहिरे याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोबाईल  शॉपीच्या व्यवसायात जम बसवला. तीन वर्षे नातेवाईक व भाड्याच्या खोली आनंदी जीवन जगत असताना तीन महिन्यांपूर्वीच ८ मे रोजी विवाह बंधनात अडकला. आता कुठे नव्या आयुष्याला सुरुवात झाली होती. पती पत्नी दोघांच्या आयुष्यात संसाररुपी वृक्ष हळूहळू झेपावत असतानाच अचानक दोघांनाही आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घ्यावा लागला. त्यांच्या आत्महत्या मागचे नेमके कारण अद्याप पुढे आले नसले, तरी त्यांचा संसार अर्ध्यावरच मोडल्याचे सत्य आता नातेवाईकांसह सर्वानाच मान्य करावे लागणार आहे.
      मुळचा साक्री धुळे येथील निलेश आहिरे व पत्नी अश्विनी अहिरे यांनी गंधारेश्वर येथील पुलावरून वाशिष्ठी नदीत उडी घेतल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजवण्याच्या सुमारास घडली होती. या दाम्पत्याचा गुरुवारी दुसऱ्या दिवशीही दाभोळ खाडीत शोध सुरू होता. खाडीकिनाऱ्यावरील सर्व गावांमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली होती. एनडीआरएफ पथकासह आहिरे यांच्या नातेवाईकांनी बोटीच्या माध्यमातून खाडीत शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. एनडीआरएफ पथक, पोलिस, शासकीय अधिकारी व कर्मचारी, अहिरे यांचे नातेवाईक वाशिष्ठी नदीसह दाभोळखाडीत अजूनही त्यांचा शोध घेत आहेत. निलेशचे वडील शासकीय सेवेत नोकरीला असून त्याला एक लहान भाऊ आहे. दहावीनंतर तो गाव सोडून चिपळूणला नातेवाईकांकडे आला होता. येथील डीबीजे महाविद्यालयात त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले. मोबाईल दुरूस्तीची त्याला आवड होती. मोबाईल दुरूस्तीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने बसस्थानका जवळील हॉटेल स्वागत जवळ मोबाईल शॉपी सुरू केली होती. शांत व मृदू स्वभावाने त्यांने ग्राहक जोडून व्यवसायात जम बसवला. लग्नापुर्वी ३ ते ४ वर्षे तो स्वतंत्रपणे भाड्याच्या घरात राहत होता. कष्टातून केलेल्या व्यवसायाच्या जोरावर त्याने जम बसवला होता. घरच्यांकडून काही मागण्याची वेळ त्याच्यावर आली नाही. गावाडील अश्विनी हिच्या सोबत विवाह झाला. दोघांचाही चांगला संसार सुरू होता. अश्विनीच्या वाढदिवसानिमित्त काही दिवसांपूर्वी आई, मामा देखील येथे काही दिवस राहिले होते. सर्व सुरळीत असल्याने २ जुलैनंतर आई गावाकडे निघून गेली. बुधवारी ३० रोजी निलेश हा नेहमीच्या वेळेत मोबाईल शॉपीमध्ये आला होता. सकाळीच त्याला नातेवाईकांनी संपर्क साधून घरी जाऊन येण्यास सांगितले. तत्काळ त्याने घर गाठले असता तेथे पत्नी घरी नसल्याचे निदर्शनास आले. तिचा शोध घेतला असता ती गांधारेश्वर पुलावर असल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली. अश्विनी नेच आत्महत्या करण्यापुर्वी घरच्या लोकांशी संवाद साधून माहिती दिली होती. दरम्यान निलेशनेही दुचाकीने गांधारेश्वर पुलावर धाव घेत पत्नीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे ती सापडली नाही. पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच त्यानेही नदीत उडी मारण्याचा निर्णय घेतला. त्यापुर्वी त्याने नातेवाईकांशी संपर्क साधल्याची माहितीही उपलब्ध झाली. असे टोकाचे पाऊल उचलू नको, आम्ही तुझ्या पाठीशी असल्याचा धिर सासरच्या लोकांकडूनही त्याला दिला. परंतू त्याने थेट नदीत उडी घेतल्याचे समजते. अश्विनी हिला चांगले पोहता येत होते, मात्र निलेशला पोहता येत नव्हते.
      या नवदाम्पत्याचा संसार सुरू होऊन अवघे तिनच महिने झाले होते. विवाहानंतर जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळी ते फिरायला देखील गेले होते. अशा परिस्थितीत या दाम्पत्याने नदीत उडी घेण्याचा निर्णय का घेतला, याचा उलघडा अद्याप झालेला नाही. याप्रकरणी चिपळूण पोलिस अधिक तपास करीत आहेत.

चौकट
अवघ्या १८ मिनिटांत घटनास्थळ गाठले!
अश्विनी वाशिष्ठी नदीत आत्महत्या करत असल्याची माहिती घरच्या मंडळींना व नातेवाईकांना मिळाल्यानंतर सगळ्यांची पळापळ झाली. त्याचवेळी गावावरून वहाळ येथील नातेवाईकांना संपर्क साधण्यात आला. त्या नातेवाईकांनी क्षणाचा वेळ घालवता गाडी घेऊन तब्बल ३० किलोमीटरचे अंतर अवघ्या १८ मिनिटात कापून थेट घटनास्थळ गाठले, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.