लांजा -: मोटरसायकलवरून घरी जात असताना अचानकपणे बिबट्याने मोटरसायकल स्वारावर झेप घेतली. मात्र त्याचा हल्ला चुकवण्याच्या नादात मोटरसायकल घसरली व तोल जाऊन खाली पडल्याने २६ वर्षीय तरुण जखमी झाला. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात तो बालमबाल बचावला आहे .लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कुवे गावातील घोडखिंड येथे बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुवे माळवाडी येथे राहणारा योगेश सुधीर पवार (वय २६ वर्षे) हा बुधवारी सायंकाळी आपले काम आटोपून रात्र नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या मोटर सायकलने घरी चालला होता. कुवे घोडखिंड या ठिकाणी तो आला असता या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे त्याच्या दिशेने झेप घेतली. अचानक बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे मोटरसायकलस्वार योगेश पवार हा घाबरून गेला. मात्र तरीही प्रसंगावधान राखून बिबट्यापासून वाचवण्यासाठी त्याने स्वतःला मोटारसायकलवर स्वतः ला झोकून दिले. तर त्याच्या पाठीमागे असलेल्या बॅगेमुळे बिबट्याच्या हल्ल्यापासून तो बालमबाल बचावला. मात्र मोटरसायकल घसरून पडल्याने तो जखमी झाला. त्यानंतर बिबट्याने जंगलाकडे धूम ठोकली.
या घटनेत योगेश पवार याच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. मात्र अशाप्रकारे बिबट्याने मोटरसायकल स्वारावर केलेल्या हल्ल्यामुळे कुवे गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
. कुवे घोडकिंड या परिसरात स्वामी विवेकानंद ही जिल्हा परिषदेची शाळा आहे. अशा परिस्थितीत बिबट्याचा हल्ला आणि मुक्त संचारामुळे येथील नागरिक आणि पालकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन खात्याने या घटनेची दखल घेऊन बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी केली जात आहे .
चौकट -:
लांजा नगर पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या कुवे गावातील घोडखिंड परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मूक्त संचार सुरू आहे. गतवर्षी याच परिसरात मादी बिबट्याचा आपल्या तीन बछड्यांसह मुक्त संचार सुरु होता. वनविभागा मार्फत कुवे घोडखिंड या ठिकाणी झाडांवर कॅमेरे देखील बसवण्यात आले होते. बुधवारी रात्री घडलेल्या घटनेने पुन्हा एकदा या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



