राजापूर : तालुक्यातील ओझर ते ओणी रस्तावर तिवरे गावातील खरब या ठिकाणी दिवसाढवळया बिबटयाने केलेल्या हल्यात ओझर येथिल श्रीम. अमिना मन्सुर मापारी जखमी झाल्या आहेत. गुरूवार १२ जून रोजी सकाळी ९ वाजता ही घटना घडली.
श्री. मनसूर अकबर मापारी रा, ओझर हे त्यांची पत्नी व मुलगा यांना त्यांची स्वतःची टू व्हीलर MH08 /2823 वरुन मौ. राजापूर येथे घेऊन जात असताना मौजे तिवरे (खरब) या ठिकाणी आले असता त्यांची पत्नी श्रीम.अमिना मनसुर मापारी रा.ओझर यांचे वर बिबट्या या वन्यप्राण्याने झडप घातली. या घटनेत श्रीम.अमिना मनसुर मापारी यांच्या उजव्या पायाच्या गुढग्याला खालच्या बाजूला बिबट्याची नखे लागली असून त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र ओणी येथे उपचार करण्यात आले असुन् त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
सदर घटना वन अधिकारी यांना समजताच त्यांनी जागेवर धाव घेऊन त्यांची विचारपूस करुन त्यांचे जाबजबाब नोंदविले आहेत व घटनास्थळी जाऊन वनपाल राजापूर जयराम बावदाणे,वनरक्षक राजापूर श्री. विक्रम कुंभार,श्री.नितेश गुरव यांनी पाहणी केली आहे. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळून गिरिजा देसाई यांनी केली आहे.