मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी लवकरच बदल होणार असून, विद्यमान अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ऐवजी प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची नवीन नियुक्ती निश्चित झाली आहे. रवींद्र चव्हाण हे ३० जून रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, १ जुलै रोजी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे.
वरळी येथील डोम सभागृहात १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या विशेष कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार आहे. या वेळी पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतरच रवींद्र चव्हाण यांना कार्याध्यक्षपद देण्यात आले होते. त्यांच्याच नेतृत्वात गेल्या काही महिन्यांत राज्यभरात अनेक नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. त्यामुळेच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत तयारीही पूर्ण झाली असून, १ जुलै रोजी रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती औपचारिकपणे घोषित होणार आहे. राज्यातील आगामी राजकीय घडामोडींना आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.