Friday, April 10, 2026

Latest Posts

भारतातील पहिला प्रयोग! रत्नागिरीत सुरू होणार ‘स्वॅम्प पोलीस’ (Swamp Police) गस्त

रत्नागिरी, दि. ९ (जिमाका): सागरी सुरक्षेला अधिक बळकट करण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून भारतात पहिल्यांदाच ‘स्वॅम्प पोलीस’ (Swamp Police) गस्त उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री तथा उद्योग व मराठी भाषा मंत्री डाॕ उदय सामंत यांच्या हस्ते उद्या शुक्रवारी दुपारी ४ वाजता नारायणमळी, नाचणे येथे पार पडणार आहे.*
     *काय आहे ‘स्वॅम्प पोलीस’ उपक्रम*
रत्नागिरी जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र, अनेक ठिकाणी खाडीकिनारे, घनदाट कांदळवन (मँग्रोव्हज) आणि दलदलीचे अत्यंत संवेदनशील भाग आहेत. अशा दुर्गम आणि चिखलाच्या भागात पारंपरिक बोटी किंवा वाहनांद्वारे गस्त घालणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते. यावर उपाय म्हणून आता कायक बोट (Kayak Boat) माध्यमातून ही गस्त घातली जाणार आहे.
*विशेष प्रशिक्षण*
  या मोहिमेसाठी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. पोलीस अधीक्षक श्री बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कायक चालवणे, दलदलीत गस्त घालणे आणि आपत्कालीन बचावकार्य करण्याचे तंत्र पोलीस कर्मचारी आत्मसात करत आहेत.
कायक बोटींमुळे अगदी अरुंद खाड्या आणि कांदळवनांच्या आतपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे, ज्यामुळे लपून चालणाऱ्या अवैध हालचालींवर वचक बसेल.
      दलदलीच्या भागात एखादी दुर्घटना घडल्यास किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास ‘स्वॅम्प पोलीस’ अत्यंत वेगाने प्रतिसाद देऊ शकतील.
सागरी सुरक्षेसाठी मैलाचा दगड
हा उपक्रम केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी एक आदर्श मॉडेल ठरणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने किनारपट्टीवरील संशयास्पद हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात बचावकार्य करण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरेल.
“स्वॅम्प पोलीस हा उपक्रम रत्नागिरी पोलीस दलाच्या आधुनिक आणि धाडसी कार्यपद्धतीचे दर्शन घडवणारा असून, सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
या नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे रत्नागिरी पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत असून, भविष्यात किनारपट्टीवरील जिल्ह्यांसाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.