रत्नागिरी: – मिरकरवाड्याचा विकास व्हावा यासाठी आम्ही गेली वीस वर्षे प्रयत्न करतो आहे. पण तो होण्यासाठी कोकणच्या सुपुत्रालाच मंत्री व्हावं लागलं, हा नियतीचा खेळ आहे!, अशी भावना राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी व्यक्त केली. मिरकरवाडा बंदराच्या विकासाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत २२ कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलते होते. यावेळी त्यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना मच्छिमारांच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य करणार असल्याचे ग्वाही दिली.
ना. सामंत म्हणाले की, या बंदराच्या विकासासाठी २२ कोटींचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, ३६ कोटींचा तिसरा आराखडा विभागाने तयार केला आहे. यातूनच इथल्या मच्छीमारांना समृद्धीची नवी दिशा मिळणार आहे. ना. नितेश राणे यांनी या बंदर विकासाचा संकल्प केला, त्यांच्यामुळेच आज मच्छीला कृषीचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे मिरकरवाडा भविष्यात राज्यातील सर्वाधिक उत्पन्न देणारे बंदर ठरेल, याचा मला विश्वास आहे. त्यामुळे गैरसमज पसरवणाऱ्यांनी थांबावं. जो देशावर, भारत मातेवर प्रेम करतो, तो आमचाच आहे. त्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अशावेळी अवैध मासेमारीला आळा घालतानाच आमचा छोटा मच्छीमारही मोठ्या मच्छीमारासारखाच जगला पाहिजे हीच आमची भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ना. राणे यांच्या कामाची प्रशंसा करताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले कोकणचा सुपुत्र मत्स्य व्यवसायासाठी जीव ओतून काम करतो, हे कोकणासाठी भाग्य आहे. नाटे आणि हरणे बंदरासाठी २०० कोटींचा निधी मंजूर झाला असून, भविष्यात मिरकरवाडा मलपीपेक्षा मोठं बंदर होईल यात दुमत नाही. त्यामुळेच माझ्या मतदारसंघात होणाऱ्या मत्स्य विकासासाठी , मच्छीमारांचं भवितव्य घडवण्यासाठी माझे नेहमीच सहकार्य असेल असेही ना. सामंत यांनी यावेळी सांगितले.



