रत्नागिरी : शहरातील पेठकिल्ला- पाथरे बाग येथे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचा अभिनंदनाचा बॅनर अचानक गायब झाल्याने भारतीय जनता पक्षाने संताप व्यक्त केला आहे. या घटनेबाबत आक्रमक होत रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गाठत फलकाची विटंबना केली असावी असा संशय व्यक्त करत आरोपींवर कारवाई व्हावी, अशी मागणीचे निवेदन भाजपतर्फे गुरुवारी (३० जानेवारी) रात्री पोलिसांना देण्यात आले आहे.
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथील अनधिकृत बांधकामे राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यामुळे एका दिवसात काढण्यात आल्याने रत्नागिरीकरानी याचे उत्स्फूर्त स्वागत केले होते. ना. नितेश राणे यांचे आभार मानण्यासाठी रत्नागिरी शहरात मंगळवारपासून भलेमोठे बॅनर झळकवण्यात आले होते; मात्र यातील पेठकिल्ला येथे उभारलेल्या बॅनर समाजकंटकाने हटविला असा संशय भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केला आहे.
एका रात्रीत हा बॅनर काढल्याने त्याची विटंबना केली असल्याचा सुद्धा संशय व्यक्त केला जात आहे. याचा सखोल तपास होऊन आरोपींवर कारवाई करावी, असे निवेदन भाजपचे जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे यांनी शहर पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांना दिले आहे.