Tuesday, March 24, 2026

Latest Posts

महामार्गाच्या कामावरून खासदार नारायण राणे आक्रमक

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गाचे काम गांभीर्याने आणि वेळेत पूर्ण करत नसेल तर संबंधित ठेकेदारांचा ठेका रद्द करा, अधिकाऱ्यांनी आता याबाबत कडक भूमिका घेतली पाहिजे, चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदाराचा हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही अशा कडक शब्दात माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी
जिल्हाधिकाऱ्यांसह संबधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. 

खा. राणे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात खातेनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी या बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे,  निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये, नगरपालिका प्रशासन प्रमुख वैभव गारवे, कोकण रेल्वेचे शैलेश बापट, जलसंपदा विभागाचे गणेश सलगर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्ण सावंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओठवणेकर, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे मानसिंग पाटील, महिला बालकल्याण विभागाचे श्रीकांत हावळे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी खा. राणे यांचे स्वागत केले.

पहिल्या पावसातच लांजा येथील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा बोजवारा उडाला होता. नागरिक आणि वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. यावेळी बैठकीत खा. राणे यांनी महामार्ग आढावा घेतला त्यावेळी त्यांनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र शब्दात नापसंती व्यक्त करताना वेळात आणि योग्य काम करत नसेल तर त्याचा ठेका रद्द करा, काम योग्य होण्यासाठी अधिकाऱ्यांनीहि प्रत्यक्ष जागेवर जाऊन ठेकेदार काय काम करतोय, किती माणसं आहेत, योग्य पद्धतीने काम होते की नाही याची खात्री करा आणि त्याचा अहवाल द्यावा, पावसाळा येत्या ७ जून पासून सुरु होतो आहे, तोपर्यंत उर्वरित कामे पूर्ण झाली पाहिजे यासाठी नियोजन करा असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या ग्रामीण रस्त्यांची काय स्थिती आहे, त्यातील किती खराब आहेत याचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा परिषदेला केल्या. 

उन्हाळ्यातील पाणी टंचाईबद्दलही खा. राणे यांनी विशेषत्वाने आढावा घेतला. यंदा रत्नागिरी जिल्ह्यातील ३७ गावातील ९० वाडयांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागला आहे. मात्र आता  रत्नागिरी जिल्हा पूर्ण टँकर मुक्त होण्यासाठी प्रयत्न करा, त्यासाठी पुढच्या वर्षीचे नियोजन आत्तापासूनच करा, गाव आणि वाडीवर असलेले पाणी स्त्रोत शोधून तेथून जनतेला कशा पद्धतीने मुबलक पाणीपुरवठा करता येईल आणि पाणीटंचाई कायमची कशी संपुष्टात येईल यासाठी प्रयत्न करा असे खा. राणे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले यासाठी त्यांनी सिंधदुर्ग जिल्ह्यातील कामांचे उदाहरण दिले.

या बैठकीत सर्व विभागांचा विस्तृत आढावा घेत खा. राणे यांनी संबंधित सर्व विभागांच्या प्रमुखांना नैसर्गिक आपत्ती काळात आपापल्या विभागांबाबत सतर्क राहून आपत्ती ओढवणार नाही आणि ओढावलीच तर त्यातून तात्काळ उपाययोजना कशी करता येईल याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना दिल्या. नैसर्गिक आपत्ती काळात प्रशासनाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावे.  तसेच मान्सूनपूर्व सर्व कामे पूर्ण करावी, शाळा सुरू होण्यापूर्वी त्या सर्व शाळांची दुरुस्ती योग्य पद्धतीने करण्याबाबत आदेश देतानाच शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन सर्वेक्षण करून योग्य ती खबरदारी घ्यावी, या पावसाळ्यात छप्पर गळतीमुळे शाळा बंद अशी माहिती किंवा बातमी येत काम नये असे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य विभागाने साथींचे आजार लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा योग्य पुरवठा करताना डॉक्टरांच्या नियुक्त्या करून साथीचे आजार पसरणार नाही याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना दिल्या. तर खा. राणे यांनी कोकण रेल्वेने केलेल्या आपत्ती काळातील उपाययोजनांची माहिती घेताना त्यांनी कोकण रेल्वे प्रशासनाकडे नवीन थांबे, नवे स्थानक याबाबत काय प्रस्ताव आहेत ते आपल्याला सादर करावेत अशा सूचना यावेळी कोकण रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या. नुकत्याच पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यात किती नुकसान झाले, जीवित हानी किती झाली, शासकीय मदत किती जणांपर्यंत पोहोचली, ज्यांच्यापर्यंत पोहोचली नाही त्यांना ती लवकरात लवकर पोहोचवा असे निर्देश दिले.

चौकट

रत्नागिरी हापूसची बर्फी भविष्यात प्रसिद्ध होऊ शकते

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांची कल्पकता आणि विकासाचा दृष्टीकोन यांचा संगम म्हणजे कोकण विकास! आजही रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा ते रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात घेत होते त्यावेळी अत्यंत वेगळी कल्पना त्यांनी उपस्थितांना दिली. यावेळी ते म्हणाले, नागपूरची संत्री प्रसिद्ध आहेत, तशीच तिथली बर्फिसुद्धा खूप लोकप्रिय आहे. त्याच धर्तीवर येथील रत्नागिरी हापुस आंबा उत्पादन वाढविताना त्याच पद्धतीने रत्नागिरी हापूस आंबा बर्फी प्रसिद्ध होऊ शकते यासाठी काय करता येईल, याचेही नियोजन करा, अशा सूचना त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.