रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामे हटविण्यासंदर्भात प्रशासनाने आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत काही मच्छीमारांनी आज (२६ जानेवारी) स्वतःहून अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी पुढाकार घेतला.
मिरकरवाडा बंदर येथील अनधिकृत बांधकामे हटविण्याबाबत मत्स्य विभागाने नोटीस बजावली आहे. ही बांधकामे मच्छीमारांनी स्वतःहून हटवावीत, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. काही दिवसांपूर्वी अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना येथील स्थानिकांनी आक्रमक होत विरोध केला होता. त्यामुळे ही सर्व अनधिकृत बांधकामे २६ जानेवारीपर्यंत स्वतःहून हटवण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या कालावधीत मच्छीमारांनी बांधकामे हटवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत काही मच्छीमारांनी आज स्वतःहून बांधकामे हटवण्यास सुरुवात केली. आज रविवारी मिरकर वाडा जेटीवर प्रशासनामार्फत पोलीस दलाचे संचलन करण्यात आले. या संचालनामध्ये पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपाधीक्षक गृह राधिका फडके, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि शहर पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर उपस्थित होते.

