Monday, March 23, 2026

Latest Posts

रत्नागिरीच्या लेकीचे मातीशी नाते; ‘स्पंदन’ चित्रपटातून उलगडणार आई, मूल आणि डॉक्टरमधील भावनिक प्रवास

रत्नागिरी: सध्या चित्रपटसृष्टीत अ‍ॅक्शन आणि ग्लॅमरची लाट असताना, नात्यांमधील ओलावा आणि सामाजिक प्रश्नांची जाणीव करून देणारा ‘स्पंदन’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची विशेष माहिती अभिनेत्री प्रीती मल्लापुरकर यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे बहुतांश चित्रीकरण प्रीती यांचे स्वतःचे गाव असलेल्या रत्नागिरीत आणि कोकणच्या निसर्गरम्य परिसरात झाले आहे. आपल्या जन्मभूमीत आणि स्वतःच्या लोकांमध्ये काम करण्याचा अनुभव अत्यंत सुखद आणि समाधानकारक असल्याचे प्रीती यांनी यावेळी भावूक होत सांगितले. व्यावसायिक क्षेत्रातून चित्रपट निर्मितीकडे वळलेले श्रीकांत कोथिंबीरे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आई, तिचे मूल आणि डॉक्टर यांच्यातील गुंतागुंतीच्या पण तितक्याच संवेदनशील नात्यावर हा चित्रपट भाष्य करतो. आजच्या काळात अशा धाडसी विषयावर चित्रपट बनवणे हे निर्मात्यांच्या सामाजिक जाणिवेचे प्रतीक असल्याचे प्रिती यांनी नमूद केले. या चित्रपटात दिग्गज अभिनेते अरुण नलावडे, प्रणव रावराणे आणि प्रिती मल्लापुरकर स्वतः महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. रत्नागिरीतील सांबरे हॉस्पिटल आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्यामुळेच या चित्रपटाचे चित्रीकरण सुलभ झाले, अशा शब्दांत त्यांनी स्थानिक जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

केवळ चित्रपटाची माहिती न देता प्रीती मल्लापुरकर यांनी यावेळी मराठी चित्रपटसृष्टीसमोरील वास्तव आणि आव्हानांवरही परखड भाष्य केले. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो, ही वस्तुस्थिती त्यांनी मांडली. अनेकदा चित्रपट प्रदर्शनावेळी होणारे राजकारण आणि प्रमोशनसाठी लागणारी मोठी यंत्रणा यामुळे चांगले विषय असूनही अनेक चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कलाकारांनी केवळ पैशांच्या मागे न धावता दर्जेदार कलाकृतींना प्राधान्य देऊन एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. ‘स्पंदन’चा शेवट अत्यंत धक्कादायक तरीही वास्तववादी असून, तो चित्रपटगृहातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला विचार करायला लावेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी निर्मिती टीम संदीप बामणे, विनय जैवाळ, दिग्दर्शक प्रवीण शेटये, अभिनेत्री यशश्री मधुरकर उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.