रत्नागिरी : रत्नागिरीतील सुप्रसिध्द प्राचीन श्रीराम मंदिरात रविवारी श्रीराम नवमीचा उत्सव अर्थात श्रीराम जन्मोत्सव सोहळा रविवारी मोठ्या भक्तीभावाने आणि थाटामाटात संपन्न होणार आहे. जन्मोत्सवानंतर सायंकाळी श्रीरामांचा रथ नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडणार असून वाजतगाजत निघणार्या या रथयात्रेचे शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. दरम्यान रविवारी राम जन्मोत्सव सोहळा संपन्न झाल्यानंतर सोमवारी महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे. येथील श्रीराम मंदिरात चैत्र शुध्द प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यापासून (३० मार्च) श्रीराम नवमी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. अतिशय धुमधडाक्यात आणि मोठ्या भक्तीभावाने हा उत्सव सुरू असून गेले ७ दिवस सुरू असलेल्या या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा चैत्र शुध्द नवमीला म्हणजेच रविवारी ६ एप्रिलला पारंपारिक पध्दतीने थाटामाटात साजरा होणार आहे. श्रीराम नवमीच्यादिवशी म्हणजेच रविवारी ६ एप्रिलला सकाळी ६ वा. नगारा चौघडा वादनाने या दिवसाची सुरूवात होईल. सकाळी ६ ते ७ या वेळात प्रभु श्रीरामचंद्रांची षोडशोपचारपूर्वक पूजा, अभिषेक संपन्न होईल. त्यानंतर देवाला छपन्न भोग नैवेद्य दाखविला जाईल. आरती होईल आणि त्यानंतर मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले होईल. सकाळी ८ ते ११ या वेळात देवळात रत्नागिरी आणि परिसरातील नामवंत भजनी मंडळी त्यांची सेवा श्रीराम चरणी रूजू करतील. त्यानंतर राम जन्मोत्सव सोहळ्याला प्रारंभ होईल.
रविवारी ६ एप्रिलला ठीक ११ वा. सुप्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प. भालचंद्रबुवा हळबे यांचे श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन सुरू होईल. दु. १२.३९ वा. श्रीरामांचा जन्मोत्सव होईल. श्रीरामरायाचा जन्म होताच उपस्थित भाविक पुष्पवृष्टी करतील. भक्तांना सुंठवडा आणि बुंदीच्या लाडवाचा प्रसाद दिला जाईल. बाळ रामाच्या मूर्तीला पाळण्यामध्ये घालण्यात येईल आणि पाळणा जोजविला जाईल. सुहासिनी पाळणा गायनही करतील. हा सारा जन्मोत्सव सोहळा यथासांग पार पडल्यानंतर दुपारपासून पुन्हा एकदा मंदिरात भजनांचे स्वर निनादणार आहेत. दरम्यान सायंकाळी ४ वा. मंदिरातून श्रीरामचंद्रांचा रथ नगर प्रदक्षिणेसाठी वाजतगाजत निघेल. या रथासोबत ढोल, ताशांची पथके, लेझिम नृत्य सादर करणारी पथके तसेच रामायण काळातील अनेक प्रसंग सादर करणारे चित्ररथ आणि श्रीरामांची पालखीदेखील या शोभायात्रेत सामील असेल. वाजतगाजत पारंपारिक मार्गावरून श्रीरामचंद्रांची ही सवारी जाणार असून ठिकठिकाणी तिचे रामभक्तंाकडून स्वागत केले जाणार आहे. या शोभायात्रेत सहभागी झालेल्या राम भक्तांसाठी अनेक मंडळांनी खानपान सेवाही ठेवली आहे. ठिकठिकाणी रामभक्त उत्स्फूर्तपणे या मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करणार आहेत. फटाक्यांच्या आतषबाजीत आणि भक्तंाच्या अमाप उत्साहात नगर प्रदक्षिणा पूर्ण करून श्रीरामचंद्रांची सवारी रात्री १० वा. पुन्हा मंदिरात येईल. तेथे श्रीरामांची आरती होईल आणि रविवारच्या कार्यक्रमांची सांगता होईल.