रत्नागिरी : रत्नागिरीत ख्रिश्चन धर्मियांनी उत्साहात साजरा केला. या निमित्त शहरातील मिलाग्रीस चर्चमध्ये बुधवारी रात्रीपासून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. सणाचे आैचित्य साधून चर्चवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. गुरूवारी सकाळी चर्चमध्ये येशूची प्रार्थना, शांती आणि प्रेमाचा संदेश देणारी प्रवचने, तसेच विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
२५ डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जातो. प्रेम, विश्वास, शांती आणि करूणा यांचा मिलाफ असलेला हा सण बुधवारी रात्रीपासून साजरा करण्यात आला. आदल्या दिवशी म्हणजे २४ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन मिलाग्रीस चर्चमध्ये करण्यात आले होते. नाताळ सणानिमित्त विद्युत रोषणाईही केली होती. मुलांसाठी आणि तरूणांसाठी हा सण उत्साहवर्धक असतो. त्यामुळे बुधवारी रात्री गाणी, विविध खेळ असे कार्यक्रम झाले. मध्यरात्री येशूचा जन्मोत्सव आनंदात साजरा करण्यात आला.
गुरूवारी भगवान येशू ख्रिस्ताच्या शिकवणीचा संदेश देणारी प्रवचने तसेच विविध मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. ख्रिस्ती धर्मियांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. घरात गोडधोड करून येशूच्या जन्मोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यात आला. दिवसभर नाताळनिमित्त ख्रिस्तीधर्मियांना शुभेच्छा दिल्या जात होत्या. इतर धर्मियांनीही चर्चला भेट देऊन भगवान येशूचे दर्शन घेतले. चर्चमध्ये दिवसभर ख्रिश्चन तसेच इतर धर्मियांचीही वर्दळ सुरू होती. बुधवारी तसेच गुरूवारी मुलांच्या लाडक्या ‘सॅंंटा’नेही मुलांना बक्षीस दिले.
…………
नवनिर्वाचित नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांची भेट
रत्नागिरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी मिलाग्रीस चर्चमध्ये येऊन सर्व ख्रिश्चन बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी फादर सेबी परेरा, स्थानिक नगरसेविका सायली पाटील, चेतना गाडेकर, युवराज शेट्ये आदी उपस्थित होते. यावेळी चर्चच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांचा सत्कार करण्यात आला.



