रत्नागिरी : कोकण भागातील क्रिकेटला मूळापासून चालना देण्याच्या उपक्रमात महाराष्ट्र प्रीमियर लीगचे दोन वेळचे विजेते जेटसिंथेसिसचे रत्नागिरी जेट्स यांनी भारतातील आघाडीचे सीफूड निर्यातदार गद्रे मरीन एक्सपोर्टसोबत भागीदारी करत 21 एप्रिल ते 21 मे 2025 दरम्यान रत्नागिरीमध्ये एक महिन्याचा समर क्रिकेट कॅम्प सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा समर कॅम्प रत्नागिरीमधील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी खुला असून, या भागातील उदयोन्मुख क्रिकेटपटू ओळखून त्यांचे कौशल्य विकसित करणे हाच यामागचा उद्देश आहे. हा कॅम्प लेव्हल 2 कोच लक्ष्मण पांडे यांच्या नेतृत्वाखाली, रत्नागिरी जेट्सचे मुख्य प्रशिक्षक रणजित पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. सहाय्यक प्रशिक्षक शुभम हणमघर आणि व्हिडिओ अॅनालिस्ट गुरुप्रसाद कुडव हे देखील प्रशिक्षक मंडळात असतील. प्रशिक्षकांची टीम फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्व अंगांवर लक्ष केंद्रित करत मूलभूत तंत्रासोबतच प्रगत कौशल्याचेही प्रशिक्षण देईल.
या कॅम्पमध्ये दररोज दोन सत्र असतील. पूर्ण दिवस सहभागी होणाऱ्यांसाठी शुल्क 5,000 रु. असून एकाच सत्रासाठी सहभाग घेणाऱ्यांसाठी शुल्क 2,500 रु. असेल. हा प्रशिक्षण कार्यक्रम मुला-मुली दोघांसाठी असून त्यातून समान संधी आणि समावेशकतेप्रती असलेली बांधिलकी आणखी मजबूत होते. स्थळ आणि नोंदणीसंबंधी अधिक माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना गद्रे मरीन एक्सपोर्टचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अर्जुन गद्रे म्हणाले: “रत्नागिरीमधील क्रिकेट नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहे पण आता त्याला सुव्यवस्थित रचना, संधी आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. रत्नागिरी जेट्ससोबतची आमची भागीदारी ही नैसर्गिक होती. ही एक अशी टीम आहे जिने केवळ या भागासाठी गौरव मिळवून दिला नाही, तर स्थानिक संस्कृतीतही ती खोलवर रुजलेली आहे. या समर कॅम्पला पाठिंबा देताना आम्ही अत्यंत उत्सुक आहोत आणि हा कॅम्प रत्नागिरी व महाराष्ट्रातील पुढच्या पिढीतील क्रिकेट हिरोंसाठी जन्मस्थान ठरेल अशी आशा आहे.”
आपल्या भावना व्यक्त करताना रत्नागिरी जेट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी. प्रफुल चंदावरकर म्हणाले, “हा उपक्रम म्हणजे श्री. अर्जुन गद्रे यांचे या भागाबद्दल असलेल्या दूरदृष्टी आणि उत्कटतेचे प्रतिबिंब आहे. त्यांनी नेहमीच समाजाला परतफेड करण्यावर विश्वास ठेवला आहे आणि हा समर कॅम्प त्याच तत्त्वज्ञानाचा उत्तम विस्तार आहे. रणजित पांडे आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली, आम्हाला खात्री आहे की हा उपक्रम तळागाळातील सुरू झालेल्या आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.”
हा समर कॅम्प म्हणजे रत्नागिरी जेट्सच्या स्थानिक क्रिकेटला बळकट करण्याच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाची पावती आहे. उच्च दर्जाचे प्रशिक्षण देऊन, लहान शहरांतील इच्छुक आणि हुशार खेळाडूंना व्यावसायिक क्रिकेटच्या दिशेने मार्गक्रमण करण्याची संधी देणे हा त्याचा उद्देश आहे. रत्नागिरी जेट्स हे या भागाचा अभिमान, एकता आणि क्रिकेटवरील प्रेमाचे प्रतीक आहे. या प्रदेशाच्या सांस्कृतिक ओळखीमध्ये खोलवर रुजलेल्या या फ्रँचायझीने विकास व संधीच्या तत्वास वाहून घेतले आहे. तळागाळातील क्रिकेटला चालना देणे, युवा आणि पात्र खेळाडूंना संधी देणे आणि पुढील पिढीतील हिरो घडवणे हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदु आहे.
रत्नागिरी जेट्स दरवर्षी नवीन मापदंड निर्माण करत आणि केवळ मैदानापुरता मर्यादित नसलेला वारसा निर्माण करत आहे. प्रचंड उत्साह आणि यश मिळवण्याच्या जिद्दीद्वारे, ही टीम जागतिक दर्जाचे क्रिकेट सादर करत असून, एक प्रेरणादायी व सामर्थ्यशाली फ्रँचायझी म्हणून सतत विकसित होत आहे.