रत्नागिरी: नागरिक आणि पोलीस दलातील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत ‘मिशन प्रगती’ हा अत्यंत लोकाभिमुख उपक्रम हाती घेतला आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आता तक्रारदारांना त्यांच्या तक्रारीची किंवा गुन्ह्याच्या तपासाची सद्यस्थिती थेट त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप आणि एसएमएसद्वारे कळवण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा पारदर्शक उपक्रम जिल्ह्यात १० जुलै २०२५ पासून कार्यान्वित करण्यात आला आहे.
अनेकदा नागरिक पोलीस ठाण्यात तक्रार किंवा एफआयआर दाखल करतात, परंतु त्यानंतर तपासाचे काय झाले किंवा प्रकरणाची कार्यवाही कुठपर्यंत पोहोचली, याबद्दल ते अनभिज्ञ असतात. तपासाची माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना वारंवार पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवावे लागतात, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाया जातात. हा अनावश्यक त्रास टाळण्यासाठी आणि पोलीस तपासात पारदर्शकता आणण्यासाठी ‘मिशन प्रगती’ सुरू करण्यात आले असून, याद्वारे गुन्ह्याचा पंचनामा, आरोपीला झालेली अटक, आरोपीला दिलेली नोटीस किंवा न्यायालयात सादर केलेले दोषारोपपत्र अशा महत्त्वाच्या टप्प्यांची माहिती तक्रारदारांना घरबसल्या मिळत आहे.



