Saturday, March 21, 2026

Latest Posts

रत्नागिरी पोलीस दलात ११२ नवीन शिपाई दाखल; पोलीस अधीक्षकांकडून कर्तव्याचे धडे

रत्नागिरी: मूलभूत पोलीस प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेले ११२ नवप्रविष्ट पोलीस शिपाई मंगळवारी (दि. १०) रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात दाखल झाले. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी गुलाब पुष्प देऊन या सर्व नवीन शिपायांचे स्वागत केले आणि त्यांना कर्तव्याप्रति समर्पण भाव ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथे ६६ पुरुष, सांगली जिल्ह्यातील तुरची येथे ४५ महिला आणि दौंड येथील नानविज येथे एका चालक पोलीस शिपायाला मूलभूत प्रशिक्षनासाठी पाठवण्यात आले होते. आपला नऊ महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून हे सर्व ११२ शिपाई रत्नागिरी पोलीस मुख्यालयात हजर झाले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नव्याने दाखल झालेल्या शिपायांशी संवाद साधला. ते म्हणाले, “सर्वांनी आपल्या कर्तव्यामध्ये शिस्त आणि समर्पण भाव ठेवावा. सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा आणि स्मार्ट पोलिसिंगवर भर द्यावा.” त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सतत प्रगती करत राहण्यासाठीही प्रोत्साहन दिले.
याप्रसंगी पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथे ‘सर्वोत्तम कमांडो कोर्स प्रशिक्षणार्थी’ म्हणून सन्मानित झालेल्या कोमल सावते आणि ‘सर्वोत्कृष्ट शिस्तप्रिय प्रशिक्षणार्थी’ ठरलेल्या अंजली यादव यांचे पोलीस अधीक्षकांनी विशेष अभिनंदन केले.
अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनीही मार्गदर्शन करताना आपल्या कामगिरीतून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे नाव उज्वल करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) राधिका फडके, राखीव पोलीस निरीक्षक राजेंद्र कुळसंगे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.