रत्नागिरी : या वर्षीच्या हंगामात विविध नैसर्गिक संकटांवर मात करत हापूस आंबा प्रथमच रत्नागिरीच्या बाजारात दाखल झाला आहे. शहरातील गोखले नाका येथील व्यापारी सतीश पवार यांच्या स्टाॅलवर गावखडीतील दत्ताराम पड्याळ यांच्या बागेतील हापूस विक्रीला आला आहे.
या वर्षी पावसाळा लांबल्यामुळे ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवला नाही. मात्र डिसेंबरमध्ये थंडी सुरू झाल्यानंतर मोहर प्रक्रिया सुरू झाली. मोहर भरपूर आला; परंतु तो निव्वळ फुलोराच ठरला, फळधारणा झाली नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी आंबा उत्पादन कमी आहे. शिवाय गतवर्षीच्या तुलनेत १५ ते २० दिवस आंबा उशिरा बाजारात आला आहे.
गावखडी येथील दत्ताराम पड्यार यांच्या बागेत ऑक्टोबरमध्ये मोहोर आला होता. पड्यार यांनी मोहोर व त्यानंतर फळांचे संरक्षण केल्याने तयार झालेला हापूस रत्नागिरीच्या बाजारात सतीश पवार यांच्याकडे विक्रीसाठी पाठविला आहे. पड्यार यांनी पाच डझनांच्या दोन पेट्या विक्रीसाठी पाठवल्या आहेत. पवार यांनी पेट्यांचे पूजन केल्यानंतरच विक्रीसाठी ठेवला आहे. तीन हजार रुपये डझन दराने विक्री झाल्याने पेटीला १५,००० रुपये दर मिळाला आहे. पवार यांच्या स्टाॅलवर देवगड हापूसही विक्रीसाठी उपलब्ध असून, २,५०० ते ३,००० रुपये डझन दराने आंबा विक्री सुरू आहे.
…….
आंबा विक्री व्यवसायात आमची दुसरी पिढी कार्यरत आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी आंबा उत्पादन कमी आहे, शिवाय आंबा १५ ते २० दिवस उशिरा आला आहे. गतवर्षी पेटीला २० हजार रुपये दर मिळाला होता. या वर्षी पहिल्या पेटीला १५ हजार रुपये दर मिळाला आहे. या वर्षीच्या हंगामातील पहिला आंबा असल्याने ग्राहकांमध्येही कमालीची उत्सुकता आहे.




